मुंबई: राज्यातील भाजपाचे जेष्ठनेते एकनाथ खडसे यांनी भाजपाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही नेत्यांचे कौतुक केले आहे. गेल्या पाच वर्षांत राज्याच्या राजकारणातून बाजूला फेकले गेलेले व त्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच अप्रत्यक्षरित्या जबाबदार धरणारे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा सूर अचानक बदलला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारलं गेल्यानं त्यांच्या नाराजीचा स्फोट झाला. पंकजा मुंडे यांच्यासोबत घेतलेल्या एका मेळाव्यात त्यांनी पक्ष सोडण्याचा इशाराही दिला होता. मात्र, आता अचानक खडसे यांनी फडणवीसांसह इतर नेत्यांचं कौतुक केल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.
सध्या सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्तानं ते वृत्तवाहिन्यांशी बोलत होते. ‘गेले चार दिवस विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे. तिथं देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील हे विरोधी पक्षाची भूमिका उत्तम मांडत आहेत. सत्ताधाऱ्यांना धारेवर धरताहेत असं चित्र आहे. आम्ही विधानसभेत असतानाही अशाच पद्धतीनं सरकारला जाब विचारायचो,’ असं ते म्हणाले.
२०१४ साली राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर खडसे हे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. मात्र, दिल्लीकरांनी फडणवीसांच्या पारड्यात वजन टाकल्यानं त्यांची संधी हुकली. तेव्हापासून ते नाराज होते. त्यांनी आपली नाराजी अनेकदा उघडपणे बोलून दाखवली होती. त्यानंतरच्या काळात घोटाळ्यांचे आरोप आणि मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानं खडसे राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला फेकले गेले होते.