तलासरी । झरी येथील ज्ञानमाता आदिवासी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने आयोजित केलेल्या रोड रेसेसमध्ये एकनाथ कुरकुटे, मृणाली पारधी, अक्षय रिंजड आणि प्रतिमा राजड पहिल्या क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. एकनाथने उच्च माध्यमिक गटाच्या 7 किलोमीटर अंतराची शर्यत जिंकली, तर या गटातील मुलींच्या 5 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत मृणाली पारधीने अव्वल स्थान पटकावले. माध्यमिक गटातील मुलांच्या 5 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत अक्षयने रिंजडने बाजी मारली, तर प्रतिमाने इतर धावपटूंना मागे टाकत या गटाचे विजेतेपद मिळवले. यावेळी घेण्यात आलेल्या शिक्षकांच्या शर्यतीत दशु वेडगा आणि सी. रोहिणी यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिला गटात प्रथम स्थान मिळवले.
तालुक्यातील 102 धावपटूंचा सहभाग लाभलेल्या या शर्यतीला तलासरी पोलीस स्थानकाचे पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत कोळी, जिल्हा परिषद सदस्या जयवंती गोरखना यांनी झेंडा दाखवला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण संस्थाचालक फादर वेन्डेल डिक्रुज, स्पर्धेच्या प्रमुख संयोजिका सिस्टर बस्तीयान फर्नांडिझ यांच्या हस्ते पार पडले.