पुणे । कोरेगाव-भीमा प्रकरणी समस्त हिंदू आघडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे गुरूजी यांच्यावर पिंपरी-चिंचवड व पुण्यात गुन्हे दाखल झाले होते. याप्रकरणी अटक टाळण्यासाठी एकबोटे यांनी अटपूर्व जामीनअर्ज पुणे येथील सत्र न्यायालयात केला होता. हा अटकपूर्व जामीनअर्ज पुणे सत्र न्यायालयाने सोमवारी फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांच्या न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे एकबोटे यांना कोणत्याहीक्षणी अटक होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात एकबोटे यांनी अॅड. चिंतामणी घाटे यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता.
एकबोटे यांच्यावरील आरोप गंभीर असल्याने त्यांना अटकपूर्व जामीन देता येणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. पुण्यातील कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारीरोजी दंगल झाली होता. यात एकाचा मृत्यू झाला होता तर शेकडो लोक जखमी झाले होते. दरम्यान, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील कोरेगाव भिमा हिंसाचार सत्यशोधन समितीने उजव्या विचारसरणीच्या मंडळींनी स्थानिकांना भडकावल्याने ही घटना घडल्याचा अहवाल दिल्याचा दावा करण्यात येत आहे. मिलिंद एकबोटे यांनी 30 डिसेंबर रोजी सणसवाडी परिसरातील एका हॉटेलात आपल्या समर्थकांची बैठक घेतल्याचेही आता समोर आले आहे, असेही आंबेडकर यांनी म्हटले होते.
पिंपरी, पुण्यात गुन्हे दाखल
कोरेगाव भीमा येथील 200 व्या विजयस्तंभ शौर्य दिनी उसळलेल्या दंगलीमागे हिंदुत्त्ववादी संघटनांचे कटकारस्थान असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. तसेच या दंगलीचे सूत्रधार पुण्यातील समस्त हिंदु एकता आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे हे असल्याचा दावा केला होता. एकबोटे यांच्यासह संभाजी भिडे गुरूजींचे या प्रकरणात नाव येताच पिंपरी-चिंचवडमधील एका 39 वर्षीय महिलेने या दोघांविरोधात तक्रार दिली होती. त्यानंतर त्यांच्यावर पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. अॅट्रासिटी, दंगल, हत्यारबंदी कायद्यांतर्गत दोघांवर गुन्हे दाखल आहेत. पिंपरीतून हा गुन्हा शिरूर पोलिसांकडे वर्ग झाला आहे. दरम्यान, पुण्यातही एकबोटे आणि भिडे यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.