पुणे : प्रतिनिधी – भीमा कोरेगाव हिंसाचाराप्रकरणात अटकेत असलेल्या मिलिंद एकबोटेंच्या परिवाराला धमकीचे पत्र आले आहे. या पत्रामध्ये एकबोटे परिवाराचा एन्काउंटर करण्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्रामध्ये एकबोटेंना अटक करण्यात आलेल्या बातम्यांची कात्रणे असून, त्याखाली एकबोटे परिवाराला तोफेच्या तोंडी द्या आणि एन्काउंटर करा, असा मजकूर लिहिण्यात आला आहे. एकबोटे यांचे बंधू डॉ. गजानन एकबोटे यांनी याबाबत पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हे पत्र मोठ्या कारस्थानाचा भाग असू शकते. यापूर्वी 19 मार्चला मिलिंद एकबोटे कोर्टामध्ये आले असताना त्यांना शाई फासण्याचा वा इजा करण्याचा प्रयत्न संजय वाघमारे नावाच्या व्यक्तीने केला होता. पोलिस कर्मचार्यांच्या सावधानतेमुळे अनिष्ट टळले. तरी उपरोक्त पत्रानुसार एकबोटे कुटुंबीय राहत असलेल्या घरी पोलिस संरक्षण द्यावे, अशी विनंती एकबोटे परिवाराने शिवाजीनगर पोलिसांना केली आहे.
फेब्रुवारीमध्येही आले होते धमकीचे पत्र
आरोपी मिलिंद एकबोटे हे सद्या येरवडा कारागृहात आहेत. त्यांना धमकीचे आलेले हे दुसरे पत्र असून यापूर्वी फेब्रुवारी महिन्यामध्ये असेच एक पत्र आले होते. याबाबत प्रो. ए. सोसायटीचे कार्याध्यक्ष व त्यांचे बंधू डॉ. गजानन एकबोटे यांनी सांगितले की, चार पोस्टकार्ड एकत्र करुन एक पत्र तयार केले आहे. त्याला एका इंग्रजी वृत्तपत्राचे कात्रण जोडून त्यावर हाताने संपूर्ण एकबोटे कुटुंबीयांना तोफांच्या तोंडी द्या आणि एन्काऊंटर करा, असा मजकूर लिहिलेला आहे. या पत्राची दखल घेऊन डॉ. एकबोटे यांनी गुरुवारी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. मिलिंद एकबोटे यांना न्यायालयात आणताना एका तरुणाने त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. त्या तरुणासह त्याच्या अन्य दोन सहकार्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेला 15 दिवस होत नाही तोपर्यंत हे धमकीचे पत्र आले असून, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पोलिस संरक्षणाच्या हालचाली सुरु
यापूर्वीही फेब्रुवारीमध्ये असेच एक धमकीचे पत्र आले होते. या विषयी नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे यांनी सांगितले की, फेब्रवारी महिन्यातही पोस्टाने अशाच प्रकारचे पत्र आले होते. पण, त्यावेळी आम्ही मिलिंद एकबोटे यांच्या जामिनाच्या प्रयत्नात असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले होते. न्यायालयात शाईफेकीचा प्रकार घडल्याने या पत्राची आम्ही गंभीर दखल घेतली असून, पोलिसांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीची पोलिसांनी आता दखल घेतली असून, त्यांच्या कुटुंबीयांना पोलिस संरक्षण देण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या होत्या.
प्रकरण चिघळू लागले…
भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडे यांना क्लीनचिट दिल्याने हे प्रकरण चिघळत चालले आहे. मागील काही दिवसांपासून त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मुंबईत आंबेडकरी बांधवांनी काढलेल्या मोर्चात मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आश्वासन दिले होते. त्यानंतर दुसर्याच दिवशी भिडे यांना मुख्यमंत्र्यांनीच क्लीनचिट दिली होती. यानंतर पुण्यात भिडे यांच्या समर्थनासाठी काढण्यात आलेल्या सन्मान मोर्चात मिलिंद एकबोटे यांची प्रतिमा घेऊन त्यांचेही समर्थन करण्यात आले होते. पुण्यातील भिडे सन्मान मोर्चाला परवानगी नाकारावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने पोलिस आयुक्तांनी केली होती. पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर भिडे, एकबोटे समर्थकांनी नदीपात्रात ठिय्या आंदोलन केले होते.