एकरक्कमी समझोता योजनेचा लाभ घेण्याचे शेतकर्‍यांना आवाहन

0

जळगाव : शासनाने राज्यातील शेतकर्‍यांसाठी राज्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 योजना जाहिर केलेली आहे. या योजनेतंर्गत जिल्ह्यातील दिड लाख रुपयांवरील लाभार्थी शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी एक वेळ समझोता योजनेअंतर्गत दिड लाख रुपयांवरील रक्कम संबंधीत जिल्हा बँकेच्या शाखेकडे 30 जुन 2018च्या आत जमा करणे आवश्यक आहे. अशी माहिती सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांनी दिली आहे.

आजपावेतो 705.56 कोटींची कर्जमाफी
या योजनेतंर्गत जिल्ह्यातील 1 लाख 88 हजार 606 पात्र शेतकरी सभासदांना 705.56 कोटी रुपयांचा कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे. जिल्ह्यात कर्जमाफी योजनेमध्ये जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संदर्भात एकुण 22 हजार 286 सभासदांना 176.15 कोटी रुपये रक्कमेचा लाभ एक रक्कमी समझोता योजनेतंर्गत मिळणार आहे. त्यापैकी 19 मेपर्यंत एक वेळ समझोता योजनेअंतर्गत (जढड) 6 हजार 391 लाभार्थ्यांना 93.55 कोटी रुपयांचा लाभ मिळाला असून उर्वरीत 15 हजार 895 सभासदांना 82.60 कोटी रुपयांचा लाभ मिळणे अद्यापपर्यंत बाकी आहे.

30 जूनपर्यंत अंतिम मुदत
जिल्ह्यातील सर्व दिड लाख रुपयांवरील लाभार्थी शेतकर्‍यांनी कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी एक वेळ समझोता योजनेअंतर्गत दिड लाख रुपयांवरील रक्कम संबंधित जिल्हा बँकेच्या शाखेकडे 30 जुन, 2018 च्या आत जमा करावी. जिल्हा बँकेकडून व इतर बँकेकडून एकाच शेतकरी कुटुंबाने दिड लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम घेतली असेल, अशा शेतकरी कुटुंबांनी राज्य शासनाने दिलेल्या वाढीव मुदतीत म्हणजेच 30 जुन, 2018 पर्यंत संबंधीत बँकेत दिड लाखावरील आपल्या हिश्याच्या रक्कमेचा भरणा केल्यास अशा शेतकर्‍यांना दिड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल. तसेच हे शेतकरी बँकेमार्फत नवीन पीक कर्ज पुरवठा उपलब्ध होण्यासाठी पात्र ठरतील. असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जळगांव यांनी शेतकर्‍यांना केले आहे.