जळगाव । राष्ट्रीय महामार्गावरील एकलग्न गावाजवळ ओव्हरटेकच्या नादात खाजगी ट्रॅव्हल बस उलटल्याची घटना 7 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत 9 प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे. यात तीन जणांना जबर दुखापत झाली आहे.
जळगावकडून अमळनेरकडे जाणारी जयभोले खाजगी ट्रॅव्हल्स बस सायंकाळी 6 वाजता जळगाव येथून निघाली होती. एकलग्न गावाजवळ एसटी बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या विरुध्द बाजुला उलटली. यात रेखाबाई सुकदेव पाटील, अजंनाबाई सुभाष पाटील रा. पाळधी, गुलाब हुसेन रा. धरणगाव, नंदू भागवत धनगर वय 22 व ज्ञानेश्वर दगडू पाटील वय 25 रा. दोघे धरणगाव, चैतराम खंडू शिरसाठ, सुनिल अंबरसिंग पाटील रा. चांदणी कुर्हा ता. अमळनेर, ज्ञानेश्वर सखाराम पाटील रा. भोरखेडा ता. धरणगाव, हे जखमी झाले आहे. तसेच पाळधी येथील आनंद नन्नवरे हे त्यांची पत्नी रत्नाबाई आनंद नन्नवरे व तीन वर्षीय मुलगा धम्मदीप नन्नवरे यांच्यासह चोपडा येथे जात होते. यात अपघातात आनंद नन्नवरे व त्यांची पत्नी रत्नाबाई देखील जखमी झाले असून तीन वर्षीय धम्मदीप हा बालंबाल बचावला आहे. अपघातातील जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असून यातील जणांना डोक्याला जबर दुखापत झाली आहे.