जळगाव । येथील एकलव्य क्रीडा संकुलात नव्याने तयार झालेले तीन बॅडमिंटन कोर्ट विद्यार्थ्यांकरीता प्रशिक्षण व सरावाकरीता खुले करण्यात आले आहे. बॅडमिंटनच्या आंतरराष्ट्रीय मानकानुसार वुडनचे तीन कोर्ट केसीई सोसायटीच्यावतीने एकलव्य क्रीडा संकुल परिसरात तयार करण्यात आले असून ऑलम्पिक दर्जाची लाईटस लावण्यात आलेले आहेत. अद्यावत प्रशस्त जागा असून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व सरावाकरीता सोयीनुसार बॅचेस उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. सकाळ सत्रात सकाळी 9 ते 11 संध्याकाळ सत्रात 5 ते 8 विद्यार्थ्यांकरीता प्रशिक्षणाकरीता राखीव ठेवण्यात आलेले आहेत.
सकाळ सत्रातील काही बॅचेस व रात्रीच्या काही बॅचेस या शहरातील बॅडमिंटन पटूंसाठी उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. तीनही वुडन बॅडमिंटन कोर्टची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभलेला आहे. एकलव्य क्रीडा 2004 मध्ये तयार करण्यात आलेले दोन वुडन बॅडमिंटन कोर्ट व नव्याने तयार झालेले तीन वुडन बॅडमिंटन कोर्ट असे एकुण पाच वुडन कोर्ट प्रशिक्षणाकरीता संस्थेच्यावतीने उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. या बॅडमिंटन प्रशिक्षण सुविधेचा जळगाव शहरातील व जिल्ह्यातील बॅडमिंटन पटूंनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन एकलव्य क्रीडा संकुल व्यवस्थापन व प्रशासनातर्फे करण्यात आलेले आहे. तसेच एकलव्य क्रीडा संकुलात नव्याने सुरु झालेला जलतरण तलाव, बास्केटबॉल, स्केटींग, प्ले सेंटर, जिन्मॅशिअम, बॅडमिंटन आदी खेळांचे नियमित प्रशिक्षण सुरु आहे. या सर्व खेळांकरीता प्रशिक्षीत असे तज्ज्ञ प्रशिक्षक उपलब्ध आहेत याचा सर्व खेळाडूंनी लाभ घ्यावा.