एकविसाव्या शतकातील शहरातील अजब सिग्नल व्यवस्था…?

0

नवी मुंबई : वाहतूक व्यवस्था सुरळीत आणि शिस्तीत चालावी यासाठी अनेक रस्त्यांच्या मुख्य भागात सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली असून अनेक वेळा वाहन चालकांकडून या व्यवस्थेचा गैरवापर होतांना दिसून आला आहे. तर अनेक वेळा सदर यंत्रणाच कोलमडली असल्याचेही दिसून आले आहे. असे असतांनाच वाशी मधील सिग्नल ची अवस्था बघून थांबायचे की जायचे, असा प्रश्न वाहनचालकांना पडला.

सिग्नल यंत्रणा अधिक लोकप्रिय
नवी मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्थेत सिग्नल यंत्रणा महत्वाची भूमिका बजावत असते. वाहतूक नियंत्रण, वाहतूक कोंडी यावर प्रभावीपणे परिणामकारक म्हणून सिग्नल कार्यरत असतात. मोठ्या शहरातील वाहतुकीचा ताण वाहतूक कर्मचार्‍यांपेक्षा जागोजागी असलेली सिग्नल यंत्रणा वाहनचालकांमध्ये अधिक लोकप्रिय आहे.

प्रशासनांमध्ये समन्वयाचा अभाव
सिग्नल यंत्रणा वाहतूक विभागाच्या अधिकारात पण सिग्नलच्या बिघाड, देखभाल दुरुस्तीचे काम, पेमेन्टचे व्यवहार नवीमुंबई महापालिकेच्या विद्युत विभागाच्या हातात आहे. वाहतूक विभाग व पालिका यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने तसेच सिग्नल यंत्रणेचे काम पाहणार्‍या ठेकेदाराला वेळेवर पेमेंट न मिळाल्याने अनेकदा शहरातील महत्वाच्या ठिकाणी सिग्नल यंत्रणा अनेकवेळा बंद अवस्थेत पाहायला मिळतात.

बिघाडाचा अर्थ काय लावावा?
सिग्नलमधील बिघाडाचा परिणाम गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडीतून पाहायला मिळतो. परिणामी वाशी डेपो ते कोपरखैराणे डेपो ह्या अंदाजे पांच किलोमीटर अंतरासाठी वीस मिनिटांच्या अवधीऐवजी तासभर लागत असतो. शहरातील वाहतूक पोलीस वाहतूक कोंडी सोडविण्याऐवजी कारवाई करण्यावर अधिक भर देताना आढळतात. सिग्नल मधील अशा बिघाडाचा अर्थ वाहनचालकांनी काय लावावा? याचे उत्तर वाहतूक विभाग देणार की पालिका? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.