लोणावळा : वेहेरगाव येथे एकवीरा देवीच्या गडावर दर्शनासाठी येणारे भाविक व कार्ला लेणी पाहण्यासाठी येणारे पर्यटक यांच्याकडून वेहेरगाव संयुक्त वन व्यवस्थापन समितीकडून उपद्रव शुल्काच्या नावाखाली पैशांची वसुली केली जात आहे. या वसुलीच्या माध्यमातून समितीकडे लाखो रुपयांचे संकलन होत आहे. संकलित झालेल्या रकमेचा विनियोग परिसराच्या साफसफाईची कामे तसेच गड व लेण्यांच्या संरक्षणासाठी होणे अपेक्षित आहे. परंतु समितीकडून अशा प्रकारची कोणतीही कामे होत नसल्याने गडावर येणारे भाविक व कार्ला लेण्या पाहण्यासाठी येणार्या पर्यटकांकडून वसूल केले जाणारे उपद्रव शुल्क म्हणजे, एक प्रकारची लूट असल्याची चर्चा सध्या वेहेरगावासह परिसरात रंगली आहे. विशेष म्हणजे, वेहेरगाव संयुक्त वन व्यवस्थापन समिती गेल्या पाच वर्षांपासून भाविक व पर्यटकांकडून हे शुल्क वसूल करत असून, आतापर्यंत या माध्यमातून लाखो रुपयांचे शुल्क संकलित झालेले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम संकलित झालेली असताना त्याचा विनियोग समितीने कोणत्या कामांसाठी केला आहे, याचा तपशील देणे गरजेचे असल्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
पाच वर्षात एकही काम केले नाही
महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग शासन निर्णय क्रमांक एफडीएम 2011/प्र. क्र. 100/फ-2 अन्वेय एकवीरा देवी लेणी परिसराची साफसफाई व स्वच्छता करणे, संरक्षण करणे, माहिती फलक लावणे व पर्यटकांसाठी गाईड नेमणे, ही कामे वेहेरगाव संयुक्त वन व्यवस्थापन समितीने मिळालेल्या शुल्कातून करणे बंधनकारक आहे. असे असताना मागील पाच वर्षात यापैकी एकही काम समितीने केलेले नाही. म्हणजे समिती केवळ भाविक व पर्यटक यांची लूट करत असल्याचे समोर आले आहे. या प्रकाराची सखोल चौकशी केल्यास त्यातून मोठा गैरव्यवहार समोर येण्याची शक्यता ग्रामस्थांकडून वर्तवली जात आहे.
कामगारांच्या पगारावरच मोठा खर्च!
संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या घटनेनुसार जमा रकमेचा निम्मा हिस्सा हा वेहेरगाव ग्रामपंचायतीला दिला जात असल्याचे समितीचे सचिव व वनरक्षक संदीप मुंडे यांनी सांगितले. वर्षाला सरासरी 12 लाख रुपये, म्हणजेच मागील पाच वर्षात येथे 60 लाख रुपये उपद्रव शुल्क जमा झाला आहे. समितीच्या उपद्रव शुल्क वसुली नाक्यावर आठ कर्मचारी काम करत असून, स्वच्छतेच्या कामासाठी केवळ दोन महिलांची नेमणूक करण्यात आली आहे. वसुली नाक्यावर जमा होणार्या शुल्कापैकी निम्मी रक्कम ही वसुली नाक्यावरील कामागारांच्या पगारासाठी खर्च होत असल्याने उपद्रव शुल्क वसुली ही परिसर साफसफाईसाठी आहे की, कामगारांच्या पगारासाठी अशीदेखील चर्चा आहे.
समिती व ग्रामपंचायतीला जबाबदारीचा विसर
नुकतीच 10 दिवसांपूर्वी एकवीरा देवीची चैत्र यात्रा पार पडली. यात्रेकरिता राज्यभरातून लाखो भाविक वेहेरगाव गावात देवीच्या दर्शनासाठी आले होते. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण झाला होता. हा कचरा गोळा करण्याचे कामदेखील या समितीने वा ग्रामपंचायतीने यात्रा संपल्यानंतर केले नाही. मुंबई महानगरपालिकेचे स्वच्छता विभागाचे कर्मचारी, ठेकेदार व अधिकारी यांच्या पथकाने शनिवारी एकवीरा देवी पायथा ते गड परिसर दरम्यान स्वच्छता मोहीम राबवत मोठ्या प्रमाणात कचरा गोळा केला. त्यामुळे समिती व ग्रामपंचायतीच्या कारभारावर ग्रामस्थांकडून सडकून टीका केली जात आहे.
शुल्क वसुली बंद करा
समिती केवळ उपद्रव शुल्काच्या नावाखाली भाविकांची व पर्यटकांची लूट करत आहे. समितीकडून जमा झालेल्या रक्कमेचा निम्मा वाटा उचलणारी वेहेरगाव ग्रामपंचायतदेखील या निधीतून भाविकांना सुख-सोयी देण्याचे कोणतेही ठोस काम करत नाही. त्यामुळे समिती व ग्रामपंचायतीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, वरिष्ठांनी याप्रकरणी लक्ष घालत संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा उपद्रव शुल्क वसुली बंद करावी, अशी मागणी भाविक व पर्यटक करत आहेत.