एकवीरा देवीसमोर पशुबळी देऊ नये

0

लोणावळा : देवदेवतांच्या जत्रांमध्ये पशुबळी देण्याची अनिष्ट प्रथा वर्षानुवर्षे आहे. यात्रेदरम्यान बकरे, कोंबडे यासह इतर प्राण्यांचा बळी दिला जातो. मात्र, हे सगळे प्रकार केवळ अंधश्रद्धेपोटी केले जात आहे. कोणत्याही देवाला पशुचा बळी देऊन नैवेद्य दाखविणे अपवित्र आहे. त्यामुळे भाविक भक्तांनी एकवीरा देवीसमोर पशुबळी देऊ नये, असे आवाहन सर्व जीव मंगल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी केले. एकवीरा देवीच्या यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यात्रा सोमवार व मंगळवार रोजी होत आहे. नवस फेडण्यासाठी अनेक भाविक पशुबळी देतात. तसेच तेथेच अन्न शिजवायचे आणि प्रसाद म्हणून त्याचे भक्षण केले जाते व सोबत मद्यप्राशनही करायचे, असा अघोरी प्रकार अनेकदा पाहायला मिळतो. अनेक ठिकाणी अशा प्रकारे पशुबळी देण्याची प्रथा चुकीची असून, भाविकांनी अशा रीतीने पशुबळी देऊ नयेत, असे आवाहन त्यांनी केले. याबाबत जनजागृतीसाठी मोहीम हाती घेतली जाणार असल्याचेही ते म्हणाले.