लोणावळा। पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील लोणावळ्याजवळ असलेल्या वरसोली टोलनाक्यावर एकवीरा देवीच्या भाविक भक्तांना टोलमाफी करा अशी मागणी श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष माजी आमदार अनंत तरे यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी स्वरुपात केली आहे. वेहेरगाव येथील कार्ला गडवासिनी एकवीरा देवीच्या यात्रेला गुढी पाडव्यापासून सुरुवात होत आहे. सष्ठी, सप्तमी व अष्टमी हे यात्रेचे मुख्य दिवस असल्याने रायगड जिल्ह्यातील लाखों कोळी, आग्री, कुणबी बांधव देवीच्या दर्शनासाठी गडावर येत असतात.
तीन किमीसाठी तीन ठिकाणी टोल
त्यांना द्रुतगती मार्गावरील खालापूर टोलनाका येथे टोल भरावा लागतो तसेच वरसोली हद्दीतील कुसगाव टोलनाका व एक किमी अंतरावर राष्ट्रीय महामार्गावर वरसोली टोलनाका येथे पुन्हा टोल भरावा लागतो आहे. वरसोली टोलनाका येथे टोल भरुन भाविक फक्त कार्ला फाटा येथे 3 किमी अंतराचा रस्ता वापरतात ही भाविकांची सुध्दा फसवणूक व लूट असल्याने वरसोली टोलनाक्यांवर भाविकांना टोलमाफी करावी अशी मागणी बांधकाममंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मागील काही वर्षापासून या मागणीकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
यात्रेआधी दिलासा द्यावा
देवीचे भक्त हे सर्वसामान्य घरातील असल्याने त्यांना चार ठिकाणी टोल भरणे परवडत नाही. तसेच 3 किमी अंतरासाठी त्यांना दोन ठिकाणी व वेहेरगाव येथे ग्रामपंचायत असा तीन ठिकाणी टोल भरावा लागतो. यात्रेपुर्वी यावर शासनाने निर्णय घेऊन भाविकांना दिलासा द्यावा अन्यथा सदरचा टोलनाका कार्ला फाट्याच्या पुढे हालवावा अशी मागणी विश्वस्त मंडळाने केली आहे. निवेदन देतेवेळी तरे यांच्यासमवेत उपाध्यक्ष मदन भोई, सचिव संजय गोविलकर, खजिनदार नवनाथ देशमुख, विश्वस्त काळुराम देशमुख, विलास कुटे, विजय देशमुख हे उपस्थित होते.