एकवीरा माता आणि काळभैरवनाथांची भेट

0

लोणावळा : एकवीरा मातेचे माहेरघर असलेल्या लोणावळ्याजवळील देवघर येथे सोमवारी पालखी मिरवणुकीचा सोहळा पारंपरिक नृत्य व वाद्याच्या निनादात मोठ्या उत्साहात पार पडला. दरवर्षीपेक्षा यावर्षी भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात मोठी गर्दी केली होती. श्री काळभैरवनाथ ट्रस्ट व काळभैरवनाथ बांधकाम समिती, देवघर यांच्या वतीने पहाटे सहा वाजता काळभैरवांचा अभिषेक करत मंदिर दर्शनासाठी खुले केले. यावेळी बांधकाम समितीचे अध्यक्ष मारुती देशमुख, सचिव अशोक कौदरे, सल्लागार महादु देशमुख, उपाध्यक्ष किसन आहेर, भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गोविंद कौदरे, रवीराज कौदरे, शंकर ढाकोळ, अनंता शिंदे आदी उपस्थित होते.

पालख्यांची मंदिर प्रदक्षिणा
श्री काळभैरवनाथ ट्रस्ट, देवघर व काळभैरवनाथ बांधकाम समिती, देवघर यांच्या वतीने या सोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते. दरवर्षी चैत्र षष्ठीला देवघरात आई एकवीरा मातेचा भाऊ काळभैरवनाथ महाराज यांचा पालखी सोहळा पार पडतो. कोकण भागातून या यात्रोत्सवासाठी दाखल होणार्‍या पालख्या या षष्ठीच्या दिवशी काळभैरवनाथ महाराज यांच्या भेटीला येत असतात. या मंदिरात आई एकवीरा व काळभैरवानाथांची भेट घडवत पालख्यांची मंदिर प्रदक्षिणा व मिरवणुक होते. मोठ्या संख्येने भाविकांनी देवघरात भैरवनाथाच्या दर्शनासाठी व पालखी सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती. भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी ट्रस्ट व सर्वच शासकीय यंत्रणांतर्फे विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या.