एकवीरा यात्रोत्सवात दारू,फटाके, वाद्य बंदी

0

लोणावळा। येथील कार्ला एकवीरा देवीच्या यात्रेचा सोहळा 2 ते 4 एप्रिल या दरम्यान संपन्न होणार आहे. यात्रा काळात याठिकाणी संपूर्ण राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनाला येत असतात. यादरम्यान याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीने जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत यात्रा काळात कार्ला, लोणावळा आणि कामशेत परिसरात तीन दिवस दारूबंदी घोषित करण्यात आली. तसेच कार्ला गडावर ऑर्केस्ट्रा, फाटाके आणि वाद्य वाजवणे यावरही बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीला यांची उपस्थिती
यात्रेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी होणारी आढावा बैठक यावेळी पुणे जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला मावळचे प्रांताधिकारी सुभाष भांगडे, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक सुवेज हक, लोणावळा पोलिस उपअधीक्षक ज्ञानेश्वर शिवथारे, तहसीलदार जोगेंद्र कट्ट्यारे, पोनि संदीप येडे पाटील, एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे, सर्व प्रमुख खात्याच्या अधिकार्‍यांसह ट्रस्टचे उपाध्यक्ष मदन भोई, खजिनदार नवनाथ देशमुख, सचिव संजय गोविलकर, काळुराम देशमुख, विलास कुटे, विजय देशमुख, पार्वताबाई पडवळ, वेहेरगावच्या सरपंच नीलिमा येवले, उपसरपंच दत्तात्रय पडवळ, संतोष येवले आदींसह ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची रूपरेषा
समस्त आगरी, कोळी, भंडारी, कुणबी आणि सी.के.पी. बांधवांसह संपूर्ण महाराष्ट्राची कुलदैवत असलेल्या एकवीरा देवीची चैत्र यात्रा यावर्षी दोन एप्रिलला सुरू होणार आहे. रविवार दि. 2 एप्रिल रोजी आई एकवीरेच्या माहेरघरात देवघर येथे भैरवनाथांची पालखी मिरवणूक, सोमवार दि. 3 एप्रिल रोजी कार्ला गडावर देवीची मुख्य पालखी मिरवणूक व मंगळवार दि. 4 एप्रिल रोजी पहाटे देवीचा तेलवणाचा व मानाचा कार्यक्रम अशी या यात्रेची रूपरेषा असणार आहे.

यात्रा कालवधीतील उपाययोजना
यात्राकाळात राज्याच्या विविध भागातून येणार्‍या लाखो भाविकांना देवीचे दर्शन सुलभतेने व्हावे याकरिता देवीचे मंदिर सलग 48 तास खुले ठेवण्यात येणार आहे. अनुचित घटना घडू नये यासाठी ट्रस्टच्या माध्यमातून विशेष काळजी घेण्यात येतेे. गड आणि वेहेरगाव, कार्ला परिसरात बंदोबस्ताकरिता पोलिस प्रशासनाच्या वतीने बंदोबस्त तैनात असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी शिवथारेंनी दिली. 2 ते 4 एप्रिल दरम्यान तीन दिवस कार्ला, वेहेरगाव, मळवली भागात तर 2 व 3 एप्रिल असे दोन दिवस लोणावळा ते कामशेत दरम्यान पूर्णतः दारूबंदी करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने यावेळी देण्यात आली. तसेच जिल्हा परिषदेकडून 24 तास पाणी उपलब्ध राहणार असून महावितरणच्या वतीने 24 तास अखंडित वीज ठेवण्याबाबत उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याशिवाय पाण्याचे टँकर, अग्निशमन व्यवस्था, रुग्णवाहिका, फिरते शौचालय आदी यंत्रणा यात्रेच्या ठिकाणी तैनात असणार आहे.

पालखीचा मानावरून भाविकांमध्ये समेट
एकवीरा देवीच्या पालखीच्या मानावरून चौल आग्राव, पेन आणि ठाणे येथील भाविकांमध्ये मागील अनेक वर्षापासून वाद सुरू आहेत. मागील वर्षी याच वादातून याठिकाणी दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती. त्या पार्श्वभूमीवर यंदा या तीनही ठिकाणच्या भाविक प्रतिनिधींना या बैठकीच्या निमित्ताने एकत्र करून त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून समेटाने मार्ग काढण्यात आला. त्यानुसार पालखी सोहळ्यात यापुढे पालखीच्या पुढील बाजूला चौल आग्रावचे दहा मानकरी खांदा लावतील तर मागील बाजूस ठाणे आणि पेन येथील प्रत्येकी दहाजण खांदा लावणार असा निर्णय सामोपचाराने घेण्यात आला आहे.