लोणावळा : येथील वेहेरगावातील कार्ला एकवीरा देवीच्या यात्रेचा सोहळा दोन ते चार एप्रिल या दरम्यान संपन्न होणार आहे. संपूर्ण राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनाला येत असतात. यात्रा काळात याठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीकोनातून तसेच यादरम्यान याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीने वेहेरगाव परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला असून तसे आदेश मावळचे तहसीलदार जोगेंद्र कट्यारे यांनी जारी केले.
याचे करू नका उल्लंघन
या आदेशानुसार कोणतेही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, शोभेची दारू, फटाके गडावर नेणे व गडावर फटाके वाजविणे, वाद्य, ढोल, ताशे, ध्वनिक्षेपके अथवा ध्वनी निर्माण करणारी वस्तू गडावर नेणे, एकाच प्रकारची व रंगाची कपडे, वेशभूषा परिधान करणे, विशेषतः एकसारखे टी शर्ट वापरणे यावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. यात्रा काळात कार्ला, लोणावळा आणि कामशेत परिसरात तीन दिवस दारूबंदी तसेच कार्ला गडावर ऑर्केस्ट्रा, फटाके आणि वाद्य वाजवणे यावर बंदी घालण्याचे आदेश प्रांताधिकारी सुभाष बगाडे यांनी संबंधित अधिकार्यांना दिले.
आढावा बैठकीला यांची उपस्थिती
मावळचे प्रांताधिकारी सुभाष बगाडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शासकीय विभागाच्या अधिकार्यांची आढावा बैठक एम.टी.डी.सी. या ठिकाणी घेण्यात आली. यावेळी लोणावळा विभागाचे पोलिस उपअधीक्षक ज्ञानेश्वर शिवथरे, तहसीलदार जोगेंद्र कट्ट्यारे, लोणावळा ग्रामीणचे प्रभारी अधिकारी संदीप येडे पाटील, लोणावळा शहरचे पो.नि. चंद्रकांत जाधव, पुरातत्व खात्याचे अधिकारी बी.जे. येळेकर, आरोग्य अधिकारी डॉ. लोहारे, वीज महावितरणचे बागल, लोणावळा नगरपरिषदेचे विजय शेवाळे तसेच एकवीरा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त संजय गोविलकर, नवनाथ देशमुख, काळूराम देशमुख, विलास कुटे, विजय देशमुख, सरपंच नीलिमा येवले, युवराज पडवळ, तानाजी पडवळ, सुरेश गायकवाड, मनोज देशमुख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
भाविकांना सेवासुविधा
यात्राकाळात 24 तास वीजपुरवठा केला जावा, पाण्याचे सर्व साठे योग्य औषधे टाकून साफ केले जावे, एस.टी. महामंडळाने एस.टी.च्या फेर्या वाढवाव्यात असे आदेशही संबंधित खात्याला यावेळी देण्यात आले. पाण्याचे टँकर व्यवस्था, अग्निशमन व्यवस्था, रुग्णवाहिका, फिरते शौचालय आदी यंत्रणेचा आढावाही यावेळी घेण्यात आला. यात्राकाळात 8 रुग्णवाहिका, 4 आरोग्य अधिकारी तसेच डॉ. डी.वाय.पाटील आणि मायमर मेडिकल कॉलेजची आरोग्य पथके याठिकाणी तैनात राहणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी यांनी दिली. यात्रा काळात एकवीरा गड, वेहेरगाव परिसरात 25 अधिकारी आणि सुमारे 300 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस विभागाच्या वतीने देण्यात आली.