एकसंघ होण्यासाठी महापुरुष हे प्रेरक शक्ती : डॉ. श्रीपाल सबनीस

0

पुणे । महापुरुष हे कोण्या एका जातीचे, धर्माचे नसतात. सर्वसामान्यांच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचा जीवनसंघर्ष असतो. त्यामुळे जातीधर्मापलिकडे जाऊन एकात्म व एकसंघ होण्यासाठी शिवाजी महाराज यांच्यासह अनेक थोर महापुरुष हे प्रेरक शक्ती आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. महावितरण व महापारेषणच्या वतीने दरवर्षीप्रमाणे सोमवारी (दि. 19) शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्य वक्ते म्हणून डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापारेषणचे मुख्य अभियंता श्री. रोहिदास मस्के तर प्रमुख पाहुणे म्हणून अधीक्षक अभियंता सर्वश्री महेंद्र दिवाकर, अनिल कोलप, सुंदर लटपटे, सतीश गायकवाड, जयंत कुलकर्णी यांची उपस्थिती होती. यावेळी मुख्य अभियंता श्री. रोहिदास मस्के यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. बाबा शिंदे यांनी तर श्री. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. श्री. शिवाजी वायफळकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला महावितरण व महापारेषणमधील अभियंते, अधिकारी, कर्मचारी व सर्व संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. रामगोपाल अहिर तसेच सर्व संघटनांचे पदाधिकारी यांनी पुढाकार घेतला.

इतिहासातील प्रेरक सुत्र स्वीकारावे
सबनीस म्हणाले, शिवाजी महाराजांनी माणुसकीच्या मुल्यावर आधारित स्वराज्य निर्माण केले. सर्व जातीधर्माचे सहकारी सोबत घेतले. त्यामुळे वर्तमानातील प्रश्‍न सोडविण्यासाठी तसेच भविष्यकाळ सुधारण्यासाठी शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वातील व इतिहासातील प्रेरक सुत्र स्वीकारली पाहिजेत.