श्रीहरीकोटा । भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच ‘इस्त्रो’ने आज श्रीहरीकोटा येथून एकाच वेळी तब्बल १०४ उपग्रहांना अंतराळात यशस्वीपणे प्रक्षेपित करण्याची देदीप्यमान कामगिरी करत नवीन विश्वविक्रमाची नोंद केली आहे. भारताने २०१५मध्ये एकचदा २० उपग्रह प्रक्षेपित केले होते. तर याआधी रशियाने २०१४ साली एकचदा ३७ उपग्रह प्रक्षेपित करत विश्वविक्रम नोंदविला होता. इस्त्रोच्या आजच्या कामगिरीमुळे हे दोन्ही विक्रम मोडीत निघाले आहेत. भारतीय बनावटीच्या ‘पीएसएलव्ही सी ३६’ या प्रक्षेपकांच्या मदतीने इस्त्रोने ही कामगिरी करून दाखवली आहे. यातून अंतराळ संशोधनातील भारताचे नाव आता आघाडीच्या देशांसोबत घेतले जाणार आहे. या अभूतपुर्व कामगिरीनंतर इस्त्रोवर कौतुकाचा वर्षाव होत असून पंतप्रधान व राष्ट्रपतींसह विविध मान्यवरांनी भारतीय शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. आज प्रक्षेपित करण्यात आलेल्या १०४ उपग्रहांमध्ये १०१ उपग्रह हे विदेशी होते हे विशेष. तर भारताचा कार्टोसॅट-२ हा अत्यंत महत्वपूर्ण उपग्रहदेखील अंतराळाततील कक्षेत यशस्वीपणे स्थिर झाला आहे. या कामगिरीमुळे इस्त्रोला आता जगभरातून खासगी उपग्रहांच्या प्रक्षेपक्षाचे काम मिळू शकते. या व्यावसायिक लाभासोबत आता जगातील मातब्बर देशही इस्त्रोच्या या कामगिरीमुळे थक्क झाले आहेत.
इस्त्रोचा विश्वविक्रम
इस्त्रोने आधीच चांद्रयान आणि मंगलयान आदींसारख्या मोहिमांच्या माध्यमातून जगभरात आपल्या गुणवत्तेचा मापदंड प्रस्थापित केला आहे. आजच्या यशस्वी मोहिमेमुळे अंतराळ संशोधनात भारताचे नाव अमेरिका, रशिया आणि चीन या आघाडीच्या देशांसोबत घेतले जाणार आहे. विशेष बाब म्हणजे ‘नासा’सह रशिया आणि चीन सरकारच्या मोहिमा अत्यंत खर्चिक असतांना ‘इस्त्रो’ने अत्यंत आटोपशीर खर्चात आपल्या मोहिमा यशस्वी केल्या आहेत. यातच एकचदा १०४ उपग्रहांना प्रक्षेपित करण्याचा विश्वविक्रम केल्यामुळे ‘इस्त्रो’च्या आणि पर्यायाने भारताच्या अंतराळ संशोधनातील लौकिकात वाढ होणार आहे.
अंतराळातील महासत्ता!
बुधवाराच्या अभूतपूर्व कामगिरीनंतर इस्रोवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून पीएसएलव्ही सी-३७ आणि कार्टोसॅट उप्रगहाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतूक केले. इस्रोची ही उल्लेखनीय कामगिरी देशासाठी आणि भारताच्या अंतराळ शास्रत्रांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे मोदींनी ट्विट करून सांगितले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही इस्त्रोच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. देशाला इस्त्रोच्या कामगिरीचा गर्व आहे. भारत अंतराळ क्षेत्रात आपली क्षमता वाढवत असल्याचे सांगत मुखर्जी यांनी ङ्गइस्त्रोफचे कौतुक केले. याशिवाय देशभरातील मातब्बर नेते, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, विविध क्षेत्रांमधील सेलिब्रिटी मंडळीनेही या यशाबद्दल भरभरून कौतुक केले. ङ्गसोशल मीडियाफतही याचीच चर्चा राहिली.