सातपूर : पाणी नसल्याने बंधाऱ्यावर भांडी धुण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील चार महिलांचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. विघ्नहर्त्याचे आगमन होत असतानाच बेळगाव ढगा येथील शिंदे कुटुंबावर विघ्न कोसळल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृतांमध्ये मनीषा अरुण शिंदे (वय ४०), वृषाली अरुण शिंदे (१९), ऋतुजा अरुण शिंदे (१६), आरती नीलेश शिंदे (वय २८) यांचा समावेश आहे. या घटनेत पत्नी व दोन मुलींच्या मृत्यूमुळे अरुण शिंदे यांचे कुटुंबच उद्ध्वस्त झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
गणरायाची स्थापना झाल्यानंतर घरात पुरेसे पाणी नसल्याने अरुण शिंदे यांच्या पत्नी मनीषा, मुलगी ऋतुजा, वृषाली व मोठी वहिनी आरती भांडी धुण्यासाठी बंधाऱ्यावर गेल्या होत्या. भांडी धूत असताना अचानक आरती नीलेश शिंदे यांचा पाय घसरून त्या बंधाऱ्यात पडल्या. त्यांना वाचविण्यासाठी मनीषा व त्यांच्या दोन्ही मुली गेल्या असता त्यांचाही बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बालिकेच्या रडण्याने मिळाली माहिती
बेळगाव शिवारात सरकारने उभारलेल्या बंधाऱ्यात घरातील भांडी धुण्यासाठी गेलेल्या चार जणी पाण्यात बुडल्यानंतर तेथे गुंभाडे वस्तीवर राहणाऱ्या एका बालिकेने पाहिले. या बालिकेच्या रडण्याच्या आवाजाने परिसरातील रहिवाशांना माहिती मिळाली. पोलिस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने बंधाऱ्यातील गाळात अडकलेल्या चारही महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.