जळगाव । महाबळ कॉलनी व मोहाडी रस्त्याला लागून असलेल्या मोहननगरात गेल्या महिनाभरापासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. महिनाभरात सात ते आठ घटना घडल्या आहेत. गेल्या महिन्यात 24 ऑगस्ट रोजी आनंदनगरात स्वामी समर्थ केंद्राच्या बाजूला शोभा हिरामण पाटील यांच्या बंद घराचे टॉमीने कुलूप तोडून चोरट्यांनी आठ ते दहा हजार रुपयांची रोकड लांबविली होती. पाटील यांच्या घराशेजारीही एका बंद घराचे कुलूप तोडण्यात आले होते. त्यातील कोणतीही वस्तू चोरी झालेली नव्हती. आता दोन दिवसापूर्वीही मोहन नगरात एका घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात चोरी केली आहे. घर मालक पुण्याला असल्याने हे घर बंद होते. घरात चोरी झाल्याचे समजल्याने रविवारी ते पुण्याहून घरी आले. या गल्लीत आठवडाभरातील ही तिसरी घटना आहे.
आनंदनगर व मोहननगर हा परिसर रामानंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतो. पोलिसांनी या भागात गस्त वाढवावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. शेजारी मोहाडीरोड, नेहरुनगर हा परिसर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. या परिसरात गस्त होत नसल्याच्या तक्रारी आहेत.