एकाच दिवशी चेन स्नेचिंगच्या दोन घटना

0

देहूरोड : देहूरोड येथे एकाच दिवशी चेन स्नेचिंगच्या दोन घटना घडल्या असून धूम स्टाईल चोरटे पुन्हा सक्रिय झाल्याने महिलावर्गात भीती पसरली आहेत. मोटर सायकलवर आलेल्या दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सव्वा चार तोळे सोन्याचे दीड लाख किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास विकासनगर येथे घडली. सुरेखा सोनवणे या एका कार्यक्रमाहून घरी येत असताना मागून दुचाकीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरुन पोबारा केला. हा प्रकार निदर्शनास येताच काहींनी त्यांचा पाठलाग केला मात्र चोरटे कोणाच्याच हाती लागले नाहीत. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत. पोलिस निरीक्षक अरुण मोरे तपास करीत आहे.

मंगल कार्यालये रडारवर
अशीच दुसरी घटना देहू येथे एका मंगल कार्यालयाच्या पार्किंग लॉटमध्ये घडली. येथील सरस्वती लॉनच्या पार्कींगमध्ये मुलीला निरोप देण्यासाठी आलेल्या सुनीता युवराज वाघीरे (रा. गव्हाणे आळी, पिंपरीगाव) यांच्या गळ्यातील सात वाट्या असलेले तीन तोळ्याचे मंगळसूत्र चोरट्याने हिसकावले. या घटनेत पार्कींग लॉटमध्ये चोरटे दबा धरुन बसले होते. वाघिरे तेथे येताच काळ्या पल्सरवरुन 30/35 वयोगटातील हे दोन चोरटे त्यांच्या जवळ आले. काही कळायच्या आतच हिसका मारुन मंगळसूत्र घेऊन ते पसार झाले. या मंगळसूत्राचा काही भाग वाघिरे यांच्या गळ्यात राहिला. मात्र, मोठा भाग चोरटे घेऊन पळाले. रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. या दोन्ही प्रकरणी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.