जळगाव । तालुक्यातील कानळदा येथे तमाशा पाहण्यासाठी गेलेल्या प्रशांत शामकिरण सपकाळे (वय-19) या तरूणाने गावाबाहेर झाडाला दोरी बांधून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी 6 वाजता उघडकीस आली. तर दुसर्या घटनेत शहरातील हर्षवर्धन कॉलनीतील अरूण प्रभाकर महाजन (35) या तरूणानेही राहत्या घरात गळफास घेतला असून याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूचीन नोंद करण्यात आली आहे. यासोबतच तीसर्या घटनेत स्टेड बँकेच्या मुख्यशाखेच्या परिसरात राहणारे संजय झेंडू पाटील (40) यांनी व चौथ्या घटनेत तांबापुरा येथील रऊफ खान अलम खान (28) या तरूणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटनाही उघडकीस आली आहे. यातच पाचव्या घटनेत दिलीप महाजन यांनी विष प्राशनकरुन आत्महत्या केली आहे. शहरासह तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी चार जणांनी गळफास घेवून तर एकाने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून शोकाकुल वातावरण पसरले आहे. दरम्यान, या पाचही तरूणांच्या मृतदेहांना जिल्हा सामान्य रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले असल्यामुळे नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. तर पहिल्या घटनेतील तरूण प्रशांत सपकाळे यांच्या मृत्यूबाबत नातेवाईकांनी संशय व्यक्त केला असून त्याचा खुन करण्यात आला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
काळद्यातील तरूणाने झाडाला घेतला गळफास; घातपाताचा आरोप
पाहिल्या घटनेत कानळदा येथील तरूणाने झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. अधिक माहिती अशी की, कानळदा येथील रहिवासी प्रशांत शामकिरण सपकाळे वय-19 हा तरूण मालवाहतुक छोटा हत्ती वाहन चालवून कुटूंबियांचा करत होता. दरम्यान, कानळदा येथे मंगळवारी मरी आईचा यात्रोत्सव होता, त्यानिमित्ताने गावात तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री आठ वाजता प्रशांत घरी असताना त्याला कोणाचा तरी फोन आला व तो लगेच घरुन बाहेर गेला. रात्रभर तो तमाश्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी थांबला. परंतू बुधवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास गावाबाहेर नांद्रा रस्त्याला एका झाडावर गळफास घेतल्याच्या अवस्थेत त्याचा मृतदेह लटकलेला दिसला. शौचास गेलेल्या वामन भाऊराव सोनवणे यांना प्रशांतचा मृतदेह आढळला. त्यांनी लागलीच गावातील नागरिकांना घटनेची माहिती कळविल्यानंतर प्रशांत याच्या आजोबा रामचंद्र देवचंद्र सपकाळे यांनाही घटेनची माहिती घेतली. यानंतर पोलिसांना कळविल्यानंतर पोलिस पंचनामा होवून मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. यावेळी नातेवाईकांनी गर्दी केली होती. दरम्यान, प्रशांत यांच्या छाती व शरिरावर खरचटलेले काही व्रण दिसून आल्याने आजोबा रामचंद्र सपकाळे यांनी शेतजमिनीच्या वादातून हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. नातेवाईक यानंतर जगन्नाथ सपकाळे व त्यांचा सुधिर जगन्नाथ सपकाळे यांच्यानावर शेतजमीन असून या वाद सुरू आहे. तर न्यायालयात देखील केस सुरू असल्याचे रामचंद्र सपकाळे यांनी सांगितले. या दिवसांपूर्वी या बाप-बेट्याकडून मारहाण व धमकविण्यात आले होते. त्याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्या आहेत. परंतू पोलिस कारवाई करत नसल्याचाही रोष त्यांनी व्यक्त केला. यानंतर शेतजमीनीच्या वादातूनच त्याचा खून झाला असा आरोप त्यांनी केला. दुपारी प्रशांत याच्यावर शवविच्छेदन होवून मृतदेह कुटूंबियांच्या ताब्यात देण्यात आला. प्रशांत याचे वडील नेरूळ येथे सेट्रींग काम करतात. तर आई सुरेखा यांचा काही वर्षापूर्वीच मृत्यू झालेला आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हर्षवर्धन कॉलनीतील घटना
दुसर्या घटनेत शहरातील हर्षवर्धन कॉलनी येथील तरूणाने बुधवारी सकाळी 7 ते 8 वाजेच्या दरम्यान सर्व्हीस वायरने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हर्षवर्धन कॉलनी येथे अरूण प्रभाकर महाजन (वय-35) हे कुटूंबियांसोबत राहत होते. तर खाजगी गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करायचे. दुमजली घर असल्यामुळे अरूण महाजन हे वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी जात होते. मंगळवारी नेहमीप्रमाणी घरी आल्यानंतर ते झोपण्यासाठी वरच्या वजल्यावर गेले. बुधवारी सकाळी 7 ते 8 वाजेच्या दरम्यानात मुलगा अरूण हा चहा पिण्यासाठी खाली आला नाही, त्यामुळे त्यास बोलविण्यासाठी आई कमलाबाई या वरच्या मजल्यावर गेल्या. त्यावेळी त्यांना अरूण हा सर्व्हीस वायरने गळफास घेतल्याचे दिसताच त्यांनी आरडा-ओरड करत खाली आल्या. वडील प्रभाकर महाजन यांनी वरती जाऊन खात्री करत त्यांनाही धक्काच बसला. परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती तालुका पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत रहिवाश्यांच्या मदतीने अरूण यांना खाली उतरविले. यानंतर मृतदेह जिल्हा रूग्णालयात नेण्यात येवून शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. अरूण महाजन यांच्या पश्चात आई-वडील तसेच अशोक, मनोज नंदकिशोर हे तीन भाऊ आहेत. तर वर्षभरापूर्वी लहान भाऊ नंदकिशोर यांचा देखील अल्पशा आजाराने मृत्यू झाला आहे. दरम्यान, अरूण यांचा पहिलाहील संसार मोडला जावून दुसरे लग्न होवून देखील तो संसार मोडला गेला होता. तर ते व्यसनाच्या आहारी गेल्याचे वडील प्रभाकर महाजन यांनी सांगितले. दरम्यान, अरूण महाजन यांचे वडील हे सेवानिवृत्त वायरमन आहेत.
स्टेट बॅक परिसरातील घटना
घडलेल्या आत्महत्त्येच्या तिसर्या घटनेत स्टेट बँकेच्या मुख्यशाखा परिसरात राहणार्या तरूणाने गळफास घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुलन परिसरात स्टेट बँकमुख्य शाखा भागात डॉ. नरेंद्र दोशी यांचा बंगला आहे. या ठिकाणी बंगल्यात काम करणारी महिला रेखा यांना बंगल्याच्या बाजुलाच राहण्यासाठी खोली दिसली असल्यामुळे त्या ठिकाणी रेखा ह्या पती संजय झेंडु पाटील यांच्यासह मुलगा वेैभव व मुलगी प्रेरणा सोबत राहतात. संजय पाटील यांना हाताला काम नसल्याने ते गेल्या काही महिन्यांपासून घरीच होते. दरम्यान, दोन्ही मुले ला.ना. शाळेत शिक्षण घेत असल्यामुळे ते बुधवारी सकाळीच शाळेत निघुन गेले तर रेखा या देखील बंगल्यात कामाला निघून गेल्या. त्यामुळे घरी संजय पाटील हे एकटेच होते. दुपारी 12 वाजेच्या सुमारास एक महिला रेखा पाटील यांच्या घरी काही कामानिमित्त आल्या असता त्यांना संजय पाटील हे गळफास घेवून आत्महत्या केल्याचे दिसून येताच महिलेने आरडा-ओरडा करण्यास सुरू केली. ही घटना लागलीच रेखा पाटील यांना कळताच त्यांनी घराकडे धाव घेत आक्रोश केला. भाचजावई निलेश पाटील यांनाही घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत संजय पाटील यांना खाली उतरवून लागलीच रिक्षातून जिल्हा सामान्य रूग्णालयात नेले. वैद्यकीय अधिकार्यांनी मात्र, तपासणी केल्यानंतर संजय पाटील यांना मृत घोषित केले. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विखरणच्या तरुणाचे विषप्राशन
विखरण, ता.एरंडोल येथील दिलीप पूना महाजन (वय 36) या तरुणाने विष प्राशन केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी 11 वाजता घडली. विष प्राशन केल्यामुळे प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.
तांबापुरातील घटना
चौथ्या घटनेत तांबापुरा येथील तरूणाने जामा मशिदीच्या तिसर्या मजल्यावर गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रऊफ खान आलम खान (वय-28) असे मयत तरूणाचे नाव आहे. रऊफ खान आलम खान हा तांबापुरा परिसरातील मच्छीबाजार जवळ राहत होता. मंगळवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास रऊफ खान या तरूणाने शनिपेठ परिसरातील जामा मशिदीच्या तिसर्या मजल्यावर गळफास घेवून आत्महत्या केली. घटना मशिदीतील नागरिकांना कळताच त्यांनी याबाबत शनिपेठ पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी नरेश सपकाळे व जितेंद्र सोनवणे यांनी भेट देवून तेथील नागरिकांच्या मदतीने मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेला. बुधवारी सकाळी रऊफ खान याच्यावर शवविच्छेदन करण्यात येवून याबाबत शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तर पूढील तपास रविंद्र पाटील हे करीत आहेत. रूग्णालयात प्रचंड गर्दी जमली होती.