पुणे । केंद्र सरकारतर्फे देशभरात शुक्रवारी ग्राम स्वराज अभियान राबविण्यात आले आहे. त्यानुसार पुण्यात गॅस जोडणी वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत जिल्ह्यात एकाच दिवसात 3 हजार 200 गॅस जोडणी देण्यात आले. यावेळी खासदार अनिल शिरोळे, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे संचालक राजेश पांडे, जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार, उज्ज्वला योजनेच्या नोडल अधिकारी अनघा गद्रे, भारत पेट्रोलियमचे संजयकुमाफ चौबे, हिंदुस्थान पेट्रोलियमचे राजनत पत्तन, ओएनजीसीचे एस.पी.सिंग आदी मान्यवर होते.
आतापर्यंत 67 हजार गॅस जोडणी
एमएनजीएलचे पांडे म्हणाले की, पूर्वी गॅस जोडणी मिळण्यासाठी लांबच लांब रांगा लागत असे. मागील तीन वर्षात 3 कोटी 50 लाखांहून अधिक गॅस जोडणी देण्यात आली आहे. नोडल अधिकारी गर्दे यांनी सांगितले की, उज्ज्वला योजनेंतर्गत आतापर्यंत 67 हजार गॅस जोडणी देण्यात आली आहे. आज एकाच दिवसात 3 हजार 200 गॅस जोडणी देण्यात आली आहे.
महिलांच्या जीवनात अमुलाग्र बदल
यावेळी खासदार शिरोळे म्हणाले की, केंद्र सरकार हे गरीब, युवक आणि समाजातील सर्व घटकांसाठी समर्पित सरकार आहे. उज्ज्वला योजनेद्वारे गोरगरीब वर्गातील महिलांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडत आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला घर, वीज, घरगुती गॅस जोडणी देणे ही केंद्र सरकारची प्राथमिकता आहे. जन-धन योजनेद्वारे भ्रष्टाचाराला पायबंद बसला असून नागरिकांना त्यांच्या हक्काचे पैसे भेट बँकेत जमा होऊ लागले आहेत. उज्जवला योजनेला मिळालेला प्रतिसाद पाहता ही एक लोक चळवळ झाली आहे. या चळवळीच्या माध्यमातून पुणे शहराला केरोसीन मुक्त करायचे आहे.