एकाच मालवाहतूक गाडीला दोन वेगवेगळ्या नंबरप्लेट

0

जळगाव। मालेगावकडून बर्‍हानपुरकडे जात असलेल्या मालवाहतुक छोटा हत्ती गाडीला गुजराल पेट्रोलपंप परिसरात कर्तव्यावर असलेल्या सीटबेल्ट तपासणीतंर्गत वाहतुक पोलिसांनी अडविले. मात्र, वाहनाची तपासणी करतांना चक्क या मालवाहतुक गाडीला दोन वेगवेगळ्या नंबरप्लेट असल्याचे पोलिसांना निदर्शनात येताच त्यांनी गाडी ताब्यात घेतली आहे. तर पुढील कारवाईसाठी वाहतुक पोलिसांनी चालकासह वाहनास रामानंद पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

सिटबेल्टची कार्यवाही करतांना प्रकार उघडकीस
मंगळवारी सकाळी मालेगावकडून बर्‍हानपुर येथे जाण्यासाठी चालक अब्दूल रईस अब्दूल सत्तार हा शकील उल्ला याच्यासोबत मालवाहतुक छोटा हत्ती गाडी घेवून निघाला होता. या दरम्यान, शहरातील गुजराल पेट्रोल पंपावर वाहतुक पोलिस कर्मचारी गजानन महाजन व चंद्रकांत सोनवणे हे कर्मचारी कर्तव्यावर असतांना सीटबेल्ट कारवाई करीत होते. त्यावेळी मालवाहतुक गाडी तेथून जात असतांना वाहतुक पोलिसांनी अडविली. यानंतर गजानन महाजन व चंद्रकांत सोनवणे यांनी मालवाहतुक गाडीची पाहणी केली असता पुढच्या नंबर प्लेटवर एमएच.05.आर.4054 क्रमांक तर मागच्या नंबरप्लेटवर एमएच.04.डीएस.1825 असे दोन वेगवेगळी क्रमांकाच्या नंबरप्लेट दिसून आल्याने वाहतुक पोलिसांना चालकावर संशय बळवताच त्यांनी मालवाहतुक गाडीसह चालक अब्दूल रईस अब्दूल सत्तार व शकील उल्ला यांना ताब्यात घेत चौकशी केली. यानंतर पुढील कारवाईसाठी मालवाहतुक गाडी व चालकास रामानंद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.