जळगाव । शहरात गणेशोत्सव यावर्षी देखील नेहमीप्रमाणे अंत्यंत उत्साहाने मनवला जात आहे. पोलीस यंत्रणा, जिल्हा, मनपा प्रशासन, गणेशोत्सव मंडळे, महामंडळ, त्यांचे पदाधिकारी तर सर्व शांततेने, सुरळित होण्यासाठी प्रयत्नपूर्वक परिश्रम घेतच असतात व आहेत. आपल्या शहराला हिंदू-मुस्लीम सलोख्याची मोठी अभिमानास्पद ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. दोन्ही धर्मातील बांधव एकमेकांच्या सणात, आनंदात सहभागी होऊन आपल्यातला एकोपा, जिव्हाळा अधिक घट्ट व्हावा यासाठी आपण एक नविन संकल्पना जळगाव फर्स्टच्या मंचावरून राबवण्याचे ठरवले आहे. डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या संकल्पने नुसार ‘जळगाव फर्स्ट’ या राजकारण रहीत बॅनरखाली राष्ट्रिय एकात्मता वृध्दिंगत करण्याच्या उदात्त हेतूने एक अभिनव संकल्पना मांडली. सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवात मुस्लिम बांधवांनी आपल्या हिंदू बांधवांशी प्रेम, स्नेह आणि एकात्मता वाढीच्या दृष्टिकोनातुन उत्सव काळात स्वयंसेवक म्हणून सेवा उपस्थिती द्यावी.
हिंदु-मुस्लिम बांधवांची संयुक्त बैठक
या संदर्भात ‘जळगाव फर्स्ट’ च्या कार्यालयात हिंदू मुस्लिम बांधवांची एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. यामध्ये मोठ्या संख्येने हिंदू-मुस्लिम समाजाचे मान्यवर तसेच तरुणांचा सक्रिय सहभाग होता. ज्यात प्रामुख्याने डॉ.राधेश्याम चौधरी, साजिद शेख, फारूक शेख, सतीश वाणी, कफिल शेख, विशाल वाघ, अशपाक पिंजारी, सलीम इनामदार डॉ.जुगलकिशोर दुबे, अमजद पठाण, फारुख मेंबर, शफी बागवान, जमील शेख, बाबा देशमुख, अय्याज मोहसीन, मीर नाझीम अली, डॉ.शरीफ शेख, राजेंद्र महाजन, फिरोज शेख, विशाल पवार, दानिश सय्यद, शोएब शेख यांची उपस्थिती होती
सद्भावाची होतेय जोपासना
बैठकीनंतर जिल्हाधिकारी महोदयांशी शिष्टमंडळाने भेट घेतली असता किशोर राजे निंबाळकर यांनी या उपक्रमाचे कौतुक करत सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. या दरम्यान सचिन नारळे, दीपक जोशी, शाम कोगटा, मनिष झंवर या मान्यवरांशी फोनवर चर्चा करून सल्ला मसलत करण्यात आली. सदर संकल्पनेला हिंदू मुस्लिम समाजातील मान्यवरांनी तसेच तरुणांनी जोरदार समर्थन दिले. या मोहीमेचा भाग म्हणून 29 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7:30 वाजता जळगाव फर्स्टची टिमने हिंदू- बांधवांसोबत राष्ट्रीय एकात्मता दलचा बँनर घेऊन, ’हिंदी है हम , वतन है हिंदोस्ता हमारा‘ म्हणत प्रथम मनपाच्या बाप्पाचे दर्शन घेऊन तेथे मा.प्रभारी महापोैर ललीतकोल्हे, नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, सुनील माळी, एच.एम.खान, राजेंद्र पाटील, सुभाष मराठे यांना गुलाबपुष्प देत शुभेच्छा दिल्या. नंतर नेहरू चौकात माजी महापोैर नितीन लढ्ढा, गणेश महामंडळाचे अध्यक्ष सचीन नारळे, पोलीस निरीक्षक ठाकूर साहेब, किशोर भोसले, राहूलसह पदाधिकार्यांना शुभेच्छा देत नवीपेठेतील पंचरत्न मंडळाचे सतीष वाणी, पदाधिकारी यांचा मुस्लिम बांधवांनी सन्मान केला. त्यानंतर जळगाव फर्स्टच्या टिमने जय गोविंदा मंडळाचे शाम कोगटा, नगरसेवक मनोज चोैधरी, पदाधिकार्यांचा सन्मान केला.
आदर्श पायंडा
यावेळी हिंदू बांधवांच्या उत्सवात, आनंदात सहभागी होत, मंडळात जाऊन पदाधिकार्यांना सन्मान, शुभेच्छा देण्याचा मुस्लीम बांधवांचा हा अभिनव, राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा आदर्श पायंडा देशभरातील हिन्दू, मुस्लीम बांधवांना प्रेरणा देणारा ठरेल. आपल्या धार्मिक भावना जोपासत जळगावच्या मुस्लीम बांधवांनी आजकाल देशात बिघडत असलेल्या धार्मिक सद्भावाच्या पार्श्वभूमीवर एक आदर्श पायंडा पडत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याच सकारात्मात राष्ट्रकार्य केल आहे. त्याबद्दल या सर्व जळगावकरांचे अभिनंदन… सलाम जळगावकर…