कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात रंगले कवीसंमेलन
पिंपरी-चिंचवड : ‘मलाच मी पुन्हा पुन्हा विकून पाहिले, जगायचे नसूनही जगून पाहिले, अखेर जीवना मला दिलास ना दगा, उगीच बोट मी तुझे धरून पाहिले’, ’पिक्या कवठाचा वास, तुझ्या बोलण्याला येतो, असा कोण रोज तुला रानवळा देतो’, ’ही परिवर्तनाची नांदी, कधी तुफान कधी आंधी, लागू नका माझ्या नादी, मला स्वप्नात म्हटले मोदी’, अशा एकाहून एक सरस कविता सादर करत कवीमंडळीने उपस्थित रसिकश्रोत्यांना अंतर्मुख केले. जीवनातील वास्तव, पती-पत्नीतील प्रेम व जिव्हाळा, निसर्गसौंदर्य, प्रेम-विडंबन, अशा अनेक विषयांना स्पर्श करत कवींनी रसिकांना खिळवून ठेवले होते. निमित्त होते; भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात रंगलेल्या कवीसंमेलनाचे. भोसरी कला क्रीडा मंचतर्फे साहित्यप्रेमींसाठी कवीसंमेलनाची मेजवानी उपलब्ध करून देण्यात आली होती.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला बाळासाहेब गव्हाणे, विजय फुगे, नगरसेवक अॅड. नितीन लांडगे, भरत लांडगे, निवृत्ती फुगे, भाऊसाहेब डोळस, माजी नगरसेविका सुनंदा फुगे, विजय भालेराव, ज्येष्ठ कवी म. भा. चव्हाण, पितांबर लोहार, आय. के. शेख, मंजिरी पाटील, रमेश डोळस, राजेंद्र सोनवणे, संजय बेंडे, मंजिरी झिंझुर्के, दत्तू ठोकळे, सुरेश डोळस, शांताराम डफळ, चंद्रकांत वानखेडे, पद्मजा सावंत, दिगंबर ढोकले, सायली वाणी, संदीप राक्षे, शशिकांत इंगळे, रामदास हिंगे, विनायक विधाते , पी. एस. बनसोडे, अमोल सुपेकर, विजय शिंदे, यशवंत थोरात, कवयित्री इनानी, आशा नवले, मनमोहन बेवडा आदींची उपस्थिती होती.
श्रोत्यांकडून दाद अन् वाहवा!
कवी पितांबर लोहार यांनी ’ही परिवर्तनाची नांदी, कधी तुफान, कधी आंधी, लागू नका माझ्या नादी, मला स्वप्नात म्हटले मोदी’ ही राजकीय व्यंगावरील कविता सादर करत वाहवा मिळवली. आय. के. शेख यांनी ’तुझी माझी जोडी बघेल सारा गाव, तू माझी मस्तानी, मी तुझा बाजीराव’ ही कविता सादर केली. कवयित्री मंजिरी पाटील यांनी ’मेघ वेडा मोर, नाचे थुई थुई, गच्चावले नभ नभ झाकोळून येई’ या कवितेने पावसाची सफर घडविली. ज्येष्ठ कवी रमेश डोळस यांनी ओघवत्या कवितेतून भोसरीचा इतिहास सांगितला. कवी राजेंद्र सोनवणे यांनी ’नक्षत्रांची सभा, रोज भरते माझ्या चांदण्याच्या दारी, ही निसर्ग कविता सादर केली. कवी संजय बेंडे यांनी ’शांतता राखा, विकास होत आहे’ ही राजकीय विडंबनावरील कविता सादर केली.
प्रेम, विडंबन अन् बरेच काही
कवी संमेलनात प्रेमावर सुरू झालेला प्रवास कधी निसर्गाच्या वाटेने तर कधी देशभक्तीच्या ओढीने पुढे सरकत गेला. राजकीय व्यंगावर भाष्य करत काहीसा विसावला तर पत्नीवर झालेल्या प्रेमभर्या विडंबनाने श्रोत्यांना आनंदही देऊन गेला. सादर झालेल्या गझल आणि लावणीनेही श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी दत्ता हगवणे यांनी केले.