मुंबई:- महाराष्ट्र राज्य, वैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रीयेमध्ये सन 2016-17 मधील माहिती पुस्तिकेतील नियम क्रमांक 1.6 अट वगळल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांवर वैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रियेमध्ये अन्याय होत आहे. 10 वी 12 वीचे शिक्षण ज्यांनी महाराष्ट्रातून केलेले आहे अशा विद्यार्थ्याचेच अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्विकारले जात आहेत. यामुळे बाहेरील राज्यात 10 वी परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. अर्ज भरण्याची मुदत कमी असल्याने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊन महाराष्ट्रातील विद्यार्थ्याचे नुकसान टाळावे अशी मागणी आ. शिरीष चौधरी यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.
चांगले गुण असूनही नुकसान
निवेदनात म्हटले आहे की, किरण रमेश पाटील यांचे वडील हे गुजरात राज्यात नोकरी करीत असल्याने त्यांचे 10 वी पर्यंतचे शिक्षण हे गुजरात राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळेत झालेले आहे. तद्नंतर पुढील शिक्षण त्यांनी महाराष्ट्रातून घेतलेले असून इयत्ता 12 वीत 67 टक्के मार्क प्राप्त झाले असून NEET Exam मध्ये 502 मार्क मिळवून ते उर्तीण झालेले असतांनाही त्यांना महाराष्ट्र राज्य, वैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रियेमध्ये केवळ 10 वीचे शिक्षण हे गुजरात राज्यात झाले असल्याने सहभाग घेता येत नाही. अशा प्रकारे महाराष्ट्रात अनेक विद्यार्थ्यावर विषयांकित नमूद केलेल्या अटीमुळे शिक्षणाचे नुकसान होत आहे.
धोरणावर लवकर विचार करावा
:- प्रवेश प्रक्रियेची मुदत दि.10 जूलै पर्यंत असल्याने शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊन महाराष्ट्रातील विद्यार्थ्याचे नुकसान टाळावे अशी मागणी आ. चौधरी यांनी केली आहे. सह-सचिव आणि ओ.एस.डी (NEET) यांचे प्रेस रिलीज क्रमांक JS(OSD)/NEET-UG/2017, Dt.23.06.2017 नुसार राज्य कोट्यासाठी त्या राज्याचे अधिवास असलेले विद्यार्थी त्या राज्यात प्रवेश अर्ज करुन शकता असे धोरण निश्चित केले आहे. याबाबत शासनाने विचार करावा असे आ.चौधरी यांनी म्हटले आहे.