एका दिवसाआड पाणी पुरवठा करण्याच्या घोषणेचे काय?

0

धुळे । शहरात उन्हाचा पारा 40 अंशावर गेला असून शहरातील नागरिकांसह पशु-प्राणी यांना सुध्दा पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. शहरात पाण्याची अत्यंत गरज असतांना महानगरपालिकेतर्फे सर्वच भागात पाच ते आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. आपण सभापती पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर दुसर्‍याच दिवशी जाहीर घोषणा केली होती की, ‘शहरातील नागरिकांना एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाईल’, मात्र ही घोषणा कागदावरच दिसत असून या घोषणेची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार? असा प्रश्‍न भारीप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब पारेराव यांच्यातर्फे स्थायी समिती सभापती वालीबेन मंडोरे यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.

जाहीर केल्याप्रमाणे पाणी पुरवठ्याची मागणी
स्थायी समिती सभापती वालीबेन मंडोरे या कार्यालयात उपस्थित नसल्याने बुधवार, 11 रोजी त्यांचे सचिव पंकज सूर्यवंशी यांच्याकडे या निवेदनाची प्रत देण्यात आली. तसेच सभापती वालीबेन मंडोरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे शहरातील नागरिकांना एकदिवसाआड पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी करण्यात आली. निवेदन देतेवेळी मिलिंद वाघ, योगेश जगताप, योगेश बेडसे, निलेश आहिरे, सागर मोहिते, गौतम बोरसे, नविन देवरे, रविंद्र झोडपे, रवी निकम, भोला आहिरे, राहुल आहिरे, विजय भामरे उपस्थित होते.