नवी दिल्ली : देशात व्यवसायपूरक वातावरण निर्मिती करण्याच्या उद्देशाने सरकारकडून आणखी एक पाऊल उचलण्यात आले आहे. याअंतर्गत आता अवघ्या एका दिवसात पॅन आणि टॅन कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) एका दिवसात परमनंट खाते क्रमांक (पॅन) आणि कर कपात खाते क्रमांक (टॅन) उपलब्ध करून देण्यासाठी कंपनी कामकाज मंत्रालयासोबत करार केला आहे, अशी माहिती अर्थ मंत्रालयाने सादर केलेल्या निवेदनात दिली.
याचा लाभ घेण्यासाठी अर्जदार कंपन्या कंपनी कामकाज मंत्रालयाच्या वेबसाईटवरुन एसपीआयसीई (आयएनसी 32) हा संयुक्त अर्जाचा फॉर्म भरतील. त्यानंतर मंत्रालयाकडून केंद्रीय प्रत्यक्ष मंडळाकडे कंपनीच्या स्थापनेविषयी सर्व माहिती पोहोचली की अर्जदाराला सहजपणे पॅन आणि टॅन कार्ड उपलब्ध होईल, असे या निवेदनात म्हटले आहे.