मुंबई: प्रत्येक दर मिनिटाला कुणी एक महिला स्वत:सोबत झालेल्या लैंगिक शोषणाची ‘मी टू’ मोहिम द्वारे गैरवर्तनाची कहानी जगापुढे आणतेय. मात्र यात एक प्रकरण असेही आहे की, एका महिलेनेच दुसऱ्या महिलेसोबत गैरवर्तन केले. या आरोपामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. कॉमेडियन कनीज सुर्का हिने आपल्या ट्विटर हँडलवर या बद्दलची माहिती सांगितली आहे. तिची महिला सहकारी कॉमेडियन अदिती मित्तल हिच्यावर बळजबरीने किस केल्याचा आरोप केला आहे.
— Kaneez Surka (@kaneezsurka) October 10, 2018
‘माझ्यासोबत जे काही घडले, ते तुम्हाला सांगणे गरजेचे आहे. दोन वर्षांपूर्वी मी एक कॉमेडी शो होस्ट करत होते. माझ्यासमोर शंभरावर लोक आणि काही कॉमेडीयन बसले होते. या सर्वांसमोर कॉमेडीयन अदिती मित्तल स्टेजवर आली आणि अचानक बळजबरीने मला किस केलं. माझ्या परवानगीशिवाय घडलेल्या या घटनेने मला प्रचंड लाजीरवाणे केले. वर्षभरापूर्वी मी हिंमत बांधून अदितीला फोन केला. आधी तिने या घटनेसाठी माझी माफी मागितली. पण नंतर माझ्याशी भांडायला लागली. या गोष्टीने मी गोंधळली आणखीच दु:खी झाले. स्वत: इतकी ओंगळवाणी गोष्ट केल्यानंतर सध्या तीच अदिती मित्तल महिलांच्या लैंगिक शोषणाविरोधात गळा काढत फिरते आहे. त्यामुळेच तिने केलेले हे कृत्य जगापुढे आणण्याचा निर्णय मी घेतला. तिने माझी जाहीर माफी मागावी. पण तिने माफी मागायला नकार दिला आहे. ओठांवर किस केला, हे तिने नाकारले आहे. माझ्याकडे पुरावे आहेत. जे पुरूष माझी पोस्ट वाचत आहेत, त्यांना मी सांगू इच्छिते की, हे तुमच्याबद्दल नाही़ नाही मी याचा वापर कुठल्या अजेंड्यासाठी वापरण्याची संधी लाटते आहे. मी कुणाचाही सूड उगवत नाहीये. हा केवळ एक दु:खद घटना संपवण्याचा प्रयत्न आहे. कृपया याचा सन्मान करा,’असे तिने लिहिले आहे.
भारतात ‘मीटू’ मोहिमेअंतर्गत कदाचित पहिल्यांदा एका महिलेने दुस-या महिलेविरोधात आवाज उठवला आहे.