पिंपरी-पुणे पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ ३ मध्ये पोलीस उपआयुक्त गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन ऑलआऊट राबविण्यात आले. या मोहिमेत तडीपार, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले, फरार अशा वेगवेगळ्या गुन्ह्यातील तब्बल २७९ गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. मोहिमेत परिमंडळ ३ मधील ५० अधिकारी आणि ४०० पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.
ही मोहीम गुरुवारी २८ रोजी रात्री नऊ ते रात्री बारा वाजेपर्यंत परिमंडळ ३ हद्दीत राबविण्यात आली. परिमंडळ ३ मधील सर्व पोलीस ठाण्यात ही मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये ३१ तडीपार गुंडांची तपासणी केली. त्यापैकी एक जण आढळून आला असून त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात आली आहे. ४४ गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींचा शोध घेण्यात आला. त्यातील १५ आरोपी पोलिसांच्या हाती लागले.
माहितगार १५२ गुन्हेगारांना तपासण्यात आले, त्यातील ५० जण सापडले. रेकॉर्डवरील व इतर ५७ गुन्हेगार तपासले असता २० गुन्हेगार आढळून आले. वॉरंट बजावण्यात आलेल्या २९ आरोपींपैकी २ आरोपी मिळाले. तसेच २२ संशयितांवर कारवाई करण्यात आली.
रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि फरार गुन्हेगारांचा शोध घेत मैदाने आणि मोकळ्या जागेत विनाकारण जमाव करून थांबणा-या मुलांच्या टोळ्या, वेगात गाडी चालवणा-यांना तपासण्यात आले. मोहिमेसाठी शहरातील काही भाग निश्चित करण्यात आला. त्या भागांमध्ये जाऊन पोलिसांनी ही मोहीम राबविली. मिळालेल्या २७९ गुन्हेगारांपैकी ७७ जणांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ६८ /६९ प्रमाणे कारवाई करण्यात आली.
११३ जणांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ३३ आरडब्ल्यू अंतर्गत कारवाई करण्यात आली. तर ७६ जणांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ११०/११२/११७ अंतर्गत कारवाई करण्यात आली. १०२ प्रमाणे १० तर मुंबई प्रोव्हिजन अॅक्ट कलम ८५ (१ ) प्रमाणे ३ गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई केवळ तीन तासांच्या मोहिमेअंतर्गत करण्यात आली आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा दरारा निर्माण झाला आहे.