सार्वजनिक सध्या व्हाट्सअपवर एक मेसेज व्हायरल होतोय,
when a rape accused is not arrested we burn candle and march,
when rape accused is arrested we burn the city incredibleindia
खरं तर या दोन ओळी वाचल्यानंतर दुसरं काही सांगायचं बाकी राहत नाही. पन्नास वर्षांपूर्वीच्या बलात्कार प्रकरणात आज निकाल लागतो. संशयिताला स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याची पुरेपूर संधी मिळते. खून – बलात्कारासारखे आरोप असूनही राजदरबारी बहुमान मिळतो. सरकार – प्रशासनातील बडी धेंडं त्याच्यासमोर नतमस्तक होतात. दबाब तंत्रांचा पुरेपूर वापर होतो. एवढं सगळं होऊन गेल्यानंतर न्यायालय एखाद्याला दोषी सिद्ध करत असेल, तर त्यासाठी सबळ पुरावे असणारच ना! पंजाब – हरियाणाला – दिल्ली – उत्तर प्रदेश अशा चार चार राज्यांना वेठीस धरू शकणार्या एका इसमाला दोषी ठरवताना, न्यायालयाने काहीच विचार केला नसेल का? आणि समजा काही त्रुटी राहिली असेलच तर वरच्या कोर्टात अपील करता येतेच की. मग हा सगळा हैदोस नेमका कशासाठी चाललाय?
कुणी कुणाचे अनुयायी असावे, ही व्यक्तिगत बाब आहे. देशाच्या संविधानाने आपल्याला धार्मिक स्वातंत्र्य दिलंय. पण तरीही मानेच्यावर डोक्यात मेंदू नावाची काही चीज असते की नाही? झाडून सगळेच देव-धर्म अपरिग्रहाची शिकवण देत असतात. लोभ – मोह – माया अधःपतनाचे कारण मानतात. तरीही संपत्तीचे बोजड प्रदर्शन करणारा आश्रम(?), पन्नास साठ गाड्या, प्रसिद्धीसाठी चालवलेला पोरखेळ, पदरी गुंड अशा माणसाला मेसेंजर ऑफ गॉड म्हणायचं याला काय अर्थ आहे? नावात नुसताच राम असो वा राम – रहीम, तेवढ्याने कुणी सद्गुरू होत नाही. पण इथे सांगायचे कुणी? कठल्याही आस्थेवाईक चॅनलवर तासभराचा स्लॉट बुक करायचा. गल्लीबोळात दोन चार भक्ती इव्हेंट घडवून आणायचे. धमाकेदार पब्लिसिटी घडवून आणायची, कि झालात तुम्ही माँ आणि बाबा. पहिले दहा सेवेकरी तुम्ही स्वतः अड्जस्ट करा, त्यांच्या मुखी चमत्कारिक कथा प्रसवा बस्स! एवढ्या भांडवलावर बाकी शेकडोंचा गोतावळा तुमच्या मागे आलाच म्हणून समजा.
खरंतर या सगळ्या प्रकाराला आपणच कारणीभूत असतो. एखादा बाबा – बुवा म्हणून प्रकट होतो तेव्हा त्याचा इतिहास काय? अभ्यास किती? तपस्या किती? याचा लेखाजोगा तपासून पाहायलाच हवा. प्रशासनानेही एखादा गुन्हा घडल्यानंतर धावाधाव करण्यापेक्षा मुळापासूनच लक्ष ठेवले तर काय चालणार नाही का? जिथे चार टाळकी एकत्र आली तरी स्वतःला शहेनशहा समजतात, तिथे हजारो अनुयायी एकवटले तर काय होऊ शकेल, याची कुणालाच कल्पना येत नाही का? राजवाड्याच्या धर्तीवर भलेथोरले तटबंदी आश्रम बांधले जात असताना, आत नेमके काय घडतंय? भविष्यात काय घडू शकेल? यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी कुणाची? किमान आसाराम बापू, स्वामी नित्यानंद, स्वामी भीमानंद, कृपालू महाराज अशी एकामागे एकाच्या संतपदाची लक्तरे टांगली जात असताना तरी सावध व्हायला नको होते का?
एखाद्या बाबाच्या दरबारी शेकड्यांनी स्त्रिया सेवेकरी म्हणून राहत असतील तर, त्यांच्याकडून नक्की कसली सेवा करून घेतली जाते ते त्यांच्या घरच्यांना – आजूबाजूच्या समाजाला – प्रशासनाला माहित असायला नको का? तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींना निनावी पत्र लिहून राम रहिमची पोलखोल करणार्या साध्वीने स्पष्ट शब्दात लिहिलंय मी घरी सांगायचा प्रयत्न केला पण कुणी विश्वासच ठेवायला तयार नाही.का? आपल्याच मुलीवर विश्वास ठेवणं इतकं अवघड का वाटलं असेल घरच्यांना? स्वतःच्या संस्कारांवर विश्वास नव्हता की समाजाची भीती होती? अंधभक्तीच्या डेर्याने सारासार विवेकबुद्धीवर इतका कसा ताबा मिळवला? की ज्यांच्यासमोर तथाकथित लब्धप्रतिष्ठित आणि मंत्री-संत्री झुकतात तो चुकीचा कसा असू शकेल? असा त्या बापड्यांचा कयास होता. अर्थात वरचे झुकतात ते श्रद्धेपोटी नव्हे तर मतांच्या राजकारणापोटी – अर्थव्यवहाराच्या गरजांपोटी हे त्या बिचार्यांना काय ठाऊक असणार म्हणा? भव्यदिव्यते पुढे नतमस्तक होणे, ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे. आधीच परिस्थितीने गांजलेला माणूस या बाबाबुवांच्या पद्धतशीर प्रचाराला – दिखाव्याला सहज भुलतो.
– सृष्टी गुजराथी
मुक्त पत्रकार, लेखिका
खारघर, मुंबई
9867298771