एका हातात रायफल आणि दुसर्‍या हातात दुधाची पिशवी घेऊन धावला आरपीएफ कॉन्स्टेबल

0

भोपाळ – चार वर्षाच्या भुकेल्या मुलीला दुध देण्यासाठी आरपीएफ कॉन्स्टेबल एका हातात रायफल आणि दुसर्‍या हातात दुधाची पिशवी घेऊन धावल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. भोपाळमधील या कर्मचार्‍याला भारतीय रेल्वेने तर पोस्टर बॉय करुन टाकले आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनीही ट्विट करत रेल्वे पोलीस दलाचे कॉन्स्टेबल इंदर यादव यांची तुलना थेट उसेन बोल्टशी केली आहे.

शफिया हाशमी यांची चार वर्षांची मुलगी भुकेली होती. कर्नाटकहून उत्तर प्रदेशच्या गोरखपूरला निघालेल्या श्रमिक ट्रेनमधून त्या प्रवास करत होत्या. ट्रेन भोपाळमध्ये काही मिनिटांसाठी थांबली असता शफिया यांनी इंदर यादव याच्याकडे मदत मागितली. मुलासाठी आपण दुधाची व्यवस्था करु शकत नसून, बिस्कीट पाण्यात बुडवून तिला भरवत आहोत असं गा-हाणं तिने इंदर यांच्यासमोर मांडले. पण इंदर यादव यांनी दुधाची व्यवस्था करण्याआधीच ट्रेन स्थानकावरुन सुटली. आपल्याला उशीर झाला असल्याचे लक्षात येताच इंदर यादव यांनी डब्याच्या दिशेने धावण्यास सुरुवात केली. एका हातात रायफल आणि दुसर्‍या हातात दुधाची पिशवी घेऊन ते वेगाने धावत सुटले. विशेष म्हणजे शफिया यांच्यापर्यंत ते पोहचले आणि दूधाची पिशवी सोपवली. ही सर्व घटना रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीत कैद झाली. त्यानंतर त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावर पियुष गोयल यांनी ट्विट करत ‘एका हातात रायफल आणि दुसर्‍या हातात दूध घेऊन धावणारा उसेन बोल्ट’ अशा शब्दात कौतुक केले.