एकीकडे वृक्षलागवड तर दुसरीकडे वृक्ष तोड

0

भुसावळ शहरातील विदारक दृष्य ः पालिका प्रशासनाने दखल घेण्याची मागणी

भुसावळ- शासनाच्या माध्यमातून वृक्ष लागवड अभियान राबवले जात असतांनाच शहराच्या विस्तारीत भागातील हिरव्यागार वृक्षांवर मात्र कुर्‍हाडीचे घाव घालुन वृक्षतोड केली जात असल्याचे विदारक चित्र आहे. या प्रकाराकडे मात्र पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने वृक्ष प्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. वृक्षतोड करणार्‍या नागरीकांवर कारवाई करण्याची मागणी पुढे येत आहे. शासनाच्या माध्यमातून वृक्षलागवड अभियान राबवले जात असल्याने अनेक शासकीय, निमशासकीय, शैक्षणिक व सेवाभावी संस्थाकडून मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली जात आहे. इतकेच नव्हेतर वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले जात असतांना शहरातील उच्चभ्रू नागरीकांची वसाहत असलेल्या विस्तारीत भागात मात्र वृक्षतोडीला प्राधान्य दिले जात आहे. याच प्रकारे रविवारी शांतीनगर भागातील महिला महाविद्यालय परीसरातील एका स्थानिक रहीवाशों ‘काम सरो वैद्य मरो’ या म्हणी प्रमाणे आपल्या घराच्या आवारातील यावर्षीच्या आंब्याच्या झाडाला लागलेल्या कैर्‍यांची तोड करून लाकुड तोड्यांमार्फत हिरव्यागार व डेरेदार आंब्याच्या वृक्षावर कुर्‍हाडीचे घालून नामशेष केले. यामुळे एकीकडे वृक्ष लागवड तर दुसरीकडे वृक्षतोड होत असल्याने वृक्षप्रेमी नागरीकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. हिरव्यागार वृक्षांची तोड करणार्‍या नागरीकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

फांद्या छाटणीच्या नावाखाली होते वृक्षतोड
शहराच्या विस्तारीत भागात घरांना अडसर ठरणार्‍या डेरेदार वृक्षांच्या फांद्या छाटण्याच्या नावाखाली सर्रासपणे वृक्षतोड केली जात आहे मात्र या प्रकाराकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने उच्चभ्रु नागरीकांचे चांगलेच फावले आहे. यासाठी पालिका प्रशासनाने पुढाकार घेवून वृक्षतोड करणार्‍या एखाद्या नागरीकावर कारवाई केल्यास अनेकांवर वचक निर्माण होईल यासाठी कारवाई करणे गरजेचे झाले आहे.

सुटीचा दिवशीच होते वृक्षतोड
पालिका प्रशासनाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारच्या वृक्षतोडीला परवानगी दिली जात नाही आणि विना परवानगीने वृक्षतोड होत असल्याची पालिका प्रशासनाकडे तक्रार प्राप्त होताच संबधीतांना केवळ नोटीस बजावली जाते. यामुळे काही नागरीक विनाकारण नोटीसींचा ससेमिरा नको म्हणून रविवार व इतर सुटीच्या दिवशी वृक्षतोडीला प्राधान्य देत असल्याचे प्रकार शहरात सर्रास घडत आहेत.

पालिका प्रशासनाचे झोपेच सोंग
नगरपालिकेच्या हद्दीतील वृक्षतोड करण्यासाठी पालिकेची परवानगी आवश्यक आहे मात्र पालिका प्रशासनाकडे कुणीही परवानगी मागत नसल्याची वस्तूस्थिती आहे तसेच एखाद्याने तक्रार केल्यास केवळ आपल्या प्रभागातील मताच्या राजकारणासाठी पालिका कर्मचार्‍यांवर दबाव आणला जातो. यामुळे पालिकेचे कर्मचारीही झोपेचे सोंग घेत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.