‘एक्झिट पोल’ची चूक संपादकांना भोवली

0

नवी दिल्ली । उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी एक्झिट पोल प्रकाशित केल्याप्रकरणी दैनिक जागरण डॉट कॉमचे संपादक शेखर त्रिपाठी यांना सोमवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई केल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. उत्तर प्रदेशमध्ये सर्व जागांवरील मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत एक्झिट पोल आणि जनमत चाचण्यांवर निवडणूक आयोगाने निर्बंध घातले आहेत. मात्र, यानंतरही दैनिक जागरण समूहाने एक्झिट पोल प्रकाशित केले. पहिल्या टप्प्यात उत्तर प्रदेशमध्ये भाजप आघाडीवर असेल असे भाकीतही या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आले होते. या एक्झिट पोलची निवडणूक आयोगाने तातडीने दखल घेत दैनिक जागरणच्या संपादक आणि व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. सोमवारी रात्री उशिरा पोलिसांनी दैनिक जागरण डॉटकॉमचे संपादक शेखर त्रिपाठी यांना अटक केली. तसेच सुकृती गुप्ता (सीईओ, जागरण न्यूज मीडिया), वरुण शर्मा (डेप्यूटी एडिटर, जागरण इंग्लिश ऑनलाइन), पूजा सेठी (डिजिटल हेड) यांच्या घरावरही पोलिसांनी छापे घातले आहेत.

दैनिक जागरणचा खुलासा

दैनिक जागरण समूहाने या संदर्भात प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. एक्झिट पोल अनावधानाने समुहाच्या इंग्रजी वेबसाईटवर प्रसिद्ध झाले. पण, वरिष्ठांना ही चूक लक्षात येताच बातमी वेबसाइटवरून हटवण्यात आली होती, असे समूहाने म्हटले आहे. इंग्रजी वेबसाइटशिवाय अन्य कोणत्याही वेबसाइटवर किंवा दैनिक जागरण वृत्तपत्रामध्येही एक्झिट पोलची बातमी नव्हती, असा दावा समूहाने केला आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशाचे आम्ही पालन करत आहोत. या संदर्भात निवडणूक आयोगाला आम्ही सविस्तर खुलासा देणार आहोत, असे समूहाने स्पष्ट केले.