एक्झिट पोलमध्ये संमिश्र निकाल

0

मुंबई । उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुकांसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका गुरुवारी अधिकृतरीत्या संपुष्टात आल्या. खरंतर या निवडणुका 8 मार्च रोजी संपणार होत्या, पण उत्तराखंडमधील कर्णप्रयाग आणि उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगर या विधानसभा मतदारसंघातील अनुक्रमे बहुजन समाजवादी पार्टी आणि समाजवादी पार्टीच्या उमेदवारांचे निधन झाल्याने या दोन ठिकाणी 9 मार्चला मतदान घेण्यात आले.

निवडणुकीच्या निकालासंदर्भात काही जण ओपीनियन पोल, काही जण निवडणुकीचे सर्वेक्षण, काही जण वैयक्तिक मताच्या आधारावर अंदाज व्यक्त करत असतात.

या सगळ्यांमध्ये एक्झिट पोलचे महत्त्व वेगळे आहे. मतमोजणीच्या आधी निवडणुकीच्या निकालांबाबत उत्सुकता वाढवण्याचे काम एक्झिट पोल करते. कुठल्या पक्षाचा जोर आहे. मतदारांचा कल कोणाकडे आहे. कुठला पक्ष निवडणुकीत बाजी मारेल हे एक्झिट पोलमध्ये स्पष्ट होते. एक्झिट पोलमध्ये अंदाज सांगण्यासाठी वेगवेगळ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांनंतर दुसर्‍या दिवशी मोठ्या संख्येत मतदारांना त्यांनी मत कोणाला दिले हे विचारले जाते. काही वेळा एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलेला अंदाज खराही ठरतो. गेल्या वर्षी बिहार आणि तामीळनाडूतील निवडणुकीच्या वेळी वर्तवण्यात आलेला एक्झिट पोलचा अंदाज खोटा ठरला होता. मागील वर्षी एप्रिल मे महिन्यात झालेल्या केरळ, पुदुचेरी, आसाम आणि पश्‍चिम बंगालमध्ये एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरला होता.

अम्मा पुन्हा मुख्यमंत्री बनल्या
तामिळनाडुमध्ये तर एक्झिट पोलचा अंदाज पुर्णपणे खोटा ठरला. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार सत्तेत असलेल्या अण्णा डिएमके पक्शाला पराभव स्विकारावा लागेल असे सांगण्यात आले. न्यूज नेशन टीव्हीच्या एक्झिट पोलमध्ये जयललीता यांच्या पार्टीला 95-99 जागा, अ‍ॅक्सीर मायइंडियाच्या एक्झिट पोलमध्ये 89-110 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. डीएमके काँग्रेस आघाडी राज्यात सरकार बनवेल असे त्यावेळी सांगण्यात आले होते. पण तामिळनाडुतील जनतेने विजयाचे माप जयललीता यांच्या पदरात टाकले. त्यावेळी 136 जागा जिंकून जयललीता पुन्हा मुख्यमंत्री झाल्या होत्या.

बिहार विधानसभा निवडणूक
ऑक्टोबर, नोव्हेंबर 2015 मध्ये बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यावेळी बहुतेक एक्झिट पोलमधून जेडीयू आरजेडी आघाडीला एनडीएकडून कडवी लढत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण 243 जागा असणार्‍या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत महाआघाडीने भाजपला चारीमुंड्या चीत केले. एबीपी नेल्सनच्या सर्वेक्षणात महाआघाडीला 130 आणि भाजपला 108 जागा मिळतील असा अंदाज होता. न्यूज एक्सच्या एक्झिट पोलमध्ये जेडीयू महाआघाडीला 130 -140 मिळतील असे सांगण्यात आलेे. या दोन्ही एक्झिट पोलमध्ये भाजप आघाडीला 111 पासून 90-100 जागा मिळतील, असा अंदाज सांगण्यात आला होता. पण जेव्हा निकाल जाहीर झाले तेव्हा 243 जागा असणार्‍या विधानसभेत लोकानी महाआघाडीला 178 जागा देऊन स्पष्ट बहुमत दिले होते.

केरळ
एक्झिट पोलने केरळ विधानसभेच्या निवडणुकीत वर्तवलेला अंदाज खरा ठरला होता. यावेळी डाव्या पक्षांची आघाडी बाजी मारेल असे सांगण्यात आले होते. सी वोटरने एलडीएफला 78 जागा मिळतील असा अंदाज सांगितला होता, तर इंडिया टुडेने एलडीएफला 94 ठिकाणी विजय मिळेल असे सांगितले होते. एक्झिट पोलने पुद्दुचेरीत काँग्रेस डीएमके आघाडी जिंकेल, असा अंदाज सांगितला होता.

आसाम
आसाम विधानसभेच्या निवडणुकीत एक्झिट पोलमध्ये भाजपच्या विजयाचा अंदाज बांधला होता. एबीपीने बीजेपीला 81 आणि चाणक्यने 90 ठिकाणी विजय मिळतील असे सांगितले होते. निवडणुकीचा निकाल जवळपास या अंदाजांप्रमाणे लागला. भाजपने 86 जागा जिंकून राज्यात सरकार स्थापन केले.

पश्‍चिम बंगाल
पश्‍चिम बंगालमधील निवडणुकींदरम्यान इंडिया टुडेच्या एक्झिट पोलमध्ये ममता बॅनर्जीना 243 जागा मिळतील असे सांगण्यात आले. पश्‍चिम बंगालच्या विधानसभेत बहुमतासाठी 148 जागांची आवश्यकता असते. चाणक्यने बॅनर्जींना 210 जागा मिळतील असे भाकित वर्तवले होते. सी वोटरने राज्यात तृणमुल काँग्रेसला 167 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला होता. शेवटी तृणमूल काँग्रेसने 211 ठिकाणी विजय मिळवत राज्यात सत्ता स्थापन केली होती.

लोकसभा निवडणुका 2014
2014 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान सगळ्याच एक्झिट पोलमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळण्याचे अनुमान काढण्यात आले होते. पण निकाल जाहीर झाल्यावर न्यूज 24 आणि चाणक्यच्य एक्झिट पोलचा अंदाज निकालाच्या जवळ जाणारा होता. या एक्झिट पोलमध्ये एनडीएला 340 आणि 70 जागा यूपीएला मिळतील असे सांगितले होते. 14 रोजी जाहीर झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपच्या एनडीए आघाडीला 334 ठिकाणी विजय मिळाला. यूपीएला मात्र केवळ 60 जागांवर समाधान मानावे लागले.