एक्स्प्रेस-वेवर आता दोन ‘तिसरे डोळे’!

0

पुणे : मुंबई-पुणे द्रूतगती महामार्गावरून प्रवास करत असाल तर आता तुमच्यावर दोन ड्रोन कॅमेर्‍यांची नजर राहणार आहे. राज्य सरकारने नुकतीच महामार्ग पोलिसांना हे ड्रोन कॅमेरे विकत घेण्यास परवानगी दिली आहे. एक कॅमेरा सरासरी 94 किलोमीटरच्या परिघात वाहतुकीवर लक्ष ठेवेल. आठवडी सुटी असली की, या द्रूतगती महामार्गावर वाहतूक कोंडी होते. खास करून लोणावळा, खंडाळाकडे जाणारे प्रवासी यांच्या वाहनांमुळे या कोंडीचा सामना करावा लागतो. बरेचवेळा दरड कोसळणे आणि पावसाळ्यातील अपघात यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ही वाहतूक कोंडी टाळण्यासह उच्चवेगात जाणार्‍या वाहनांना अटकाव घालण्यासाठीही हे ड्रोन कॅमेरे महामार्ग पोलिसांच्या कामी येणार आहेत.

ड्रोन कॅमेरे येण्यास वेळ लागणार!
द्रूतगती महामार्गावर पहिली लेन ही ओव्हरटेक करण्यासाठी असते, दुसरी लेन ही कार व इतर छोटी वाहने जाण्यासाठी आहे. तर तिसरी लेन ही बस व अवजड वाहनांसाठी आहे. तरीही अनेक वाहनचालक या लेनची शिस्त पाळताना दिसत नाही. त्यामुळे द्रूतगती महामार्गावर वारंवार अपघात होत आहेत. या महामार्गावर ड्रोन कॅमेरे लावले तर ही शिस्त न पाळणार्‍या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करता येईल. तसेच, त्यांना वेळीच अटक घालून अपघातांच्या घटना टाळता येणे शक्य होईल. दरम्यान, महामार्ग पोलिस अधीक्षक विजय पाटील यांनी सरकारकडून आणखी दोन ड्रोन कॅमेरे खरेदीसाठी परवानगी मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. पोलिसांनी सद्या कोटेशन सादर केले असून, प्रत्यक्षात ड्रोन कॅमेरे खरेदीला थोडा वेळ लागेल, असेही ते म्हणाले.

राज्य सरकारकडे अहवाल सादर
ऑगस्ट 2016 मध्ये ड्रोन कॅमेराची द्रूतगती महामार्गावर पहिल्यांदा यशस्वी चाचणी झाली होती. या कॅमेर्‍याच्या साहाय्याने लेन शिस्तीचे उल्लंघन करणार्‍या 41 वाहनचालकांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आलेली आहे. ड्रोनद्वारे वाहतूक नियंत्रणाबाबत काही त्रुटीही आहेत. त्याबाबतचा सविस्तर अहवालही राज्य सरकारकडे सादर करण्यात आलेला आहे. त्यात, पावसाळ्याच्या काळात या कॅमेर्‍याद्वारे घेतल्या गेलेल्या प्रतिमा फारशा सुस्पष्ट नसतात. त्यामुळे या कॅमेर्‍याची उच्च तंत्रज्ञानयुक्त सुधारित आवृत्ती घेण्याचाही सरकार विचार करत आहे. सरासरी 30 मीटर उंचीवरून घेतलेल्या प्रतिमा चांगल्या असतात, असेही महामार्ग पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले.