मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर कामशेत बोगद्याजवळ ट्रक आणि क्रेनची धडक होऊन अपघात झाला आहे. तर दुसर्या एका घटनेत बस आणि कारचा अपघात झाला असून या अपघातात तीन ठार झाले आहेत. परिणामी मुंबईकडे येणार्या दिशेने प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. ऐन रविवारी झालेल्या या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत. पहिला अपघात सकाळी सव्वाआठच्या सुमारास हा अपघात झाला. तर यानंतर काही तासांच्या अंतराने दुसरा अपघात झाला आहे.
एक्सप्रेस वे वर मुंबईच्या दिशेने येणार्या वाहतुकीचा या दोन्ही अपघातांमुळे पुरता बोजवारा उडाला आहे. दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ट्रक आणि के्रन यांचा कामशेत बोगदा ते ताजे पेट्रोलपंपदरम्यान अपघात घडला होता. भरधाव वेगात असणार्या ट्रकचे नियंत्रण सुटल्याने तो समोरून जाणार्या क्रेनवर मागून जोरात आदळला. या अपघातात दोन जण जखमी आहेत. हा ट्रक अंडी घेऊन निघाला होता, परिणामी रस्त्यावर फुटलेल्या अंड्यांचा खच पडला आहे. अंडी घेऊन जाणार्या ट्रकमधल्या अंड्यांचा रस्त्यावर खच पडून रस्ता बुळबुळीत झाला होता. परिणामी गाड्या थांबवून रस्ता धुण्याचे काम हाती घेण्यात आले होते.
दरम्यान, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बस आणि कारचा अपघात होण्याची आणखी एक घटना घडली. या अपघातात तीन जण ठार झाले असून तीन जखमी झाले आहेत. अपघातातील प्रवासी विरार येथील रहिवासी आहेत. या अपघातामध्ये श्रद्धा पाटील (19), भामिनी देशमुख (60), दत्तात्रय देशमुख (63) यांचा मृत्यू झाला आहे. तर, रुपेश देशमुख (34), संजना पाटील (15) आणि ओम पाटील (2) हे जखमी झाले आहेत. दुपारच्या सुमारास कामशेत बोगद्याजवळ कार आणि बसचा अपघात झाला. रस्त्यावर ऑईल सांडल्यामुळे कार घसरली. कारने बसला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणार्या मार्गावरील वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.