मुंबई। शेतकर्यांविषयी सहवेदना व्यक्त करण्यासाठी आणि शेतकरीविरोधी कायद्यांचा निषेध करण्यासाठी किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी राज्यव्यापी उपोषणाची हाक दिली आहे. 19 मार्च रोजी ज्यांना ज्यांना शक्य आहे, त्यांनी आपापल्या ठिकाणाहून या उपोषणात सहभागी होण्याचे आवाहनही अमर हबीब यांनी केले आहे.
शेतकर्यांच्या आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती आहे. या आपत्तीच्या वेळेस आपण आपले किरकोळ मतभेद बाजूला ठेवूया. सारा महाराष्ट्र शेतकर्यांच्या बाजूने उभा ठाकला तरच मरणाच्या दारावर उभा राहिलेला शेतकरी मागे फिरेल आणि सरकारलाही शेतकरीविरोधी कायदे रद्द करणे भाग पडेल, असेही अमर हबीब यांनी सांगितले.
अमर हबीब यवतमाळमध्ये उपोषणाला बसणार
किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी उपोषणाची हाक दिली असून, ते स्वत:ही या उपोषणात सक्रिय सहभाग घेणार आहेत. अमर हबीब हे यवतमाळ जिल्ह्यातील महागावमध्ये उपोषणाला बसणार आहेत. ज्यांना महागावला जाणे शक्य आहे, त्यांनी तिथेही सहभागी होऊन पाठिंबा दर्शवण्याचे आवाहन अमर हबीब यांनी केले आहे.
दिग्गजांचा उपोषणाला पाठिंबा
साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक आसाराम लोमटे हे या उपोषणात सक्रीय सहभागी होणार आहेत. शेती, शेतकरी, गरिबी याबाबत भिडणारे लेखन करणार्या लेखकाचा शेतकर्यांसाठीच्या उपोषणाला पाठिंबा मिळाल्याने आनंद वाटल्याच्या भावना अमर हबीब यांनी व्यक्त केली आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद अशा मोठ्या शहरांसह गाव-खेड्यांमधूनही शेतकरी आणि शेतकर्यांची मुले-मुली या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सक्रिय सहभाग घेणार असल्याची माहिती अमर हबीब यांनी दिली.
शरद जोशींचे सहकारी म्हात्रे सरांचाही सहभाग
शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचे अत्यंत निकटवर्तीय व विश्वासू सहकारी प्राचार्य सुरेशचंद्र म्हात्रे हेही या उपोषणात सहभागी होणार आहेत. 19 मार्च रोजी होणार्या उपोषण आंदोलनाला त्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
उपोषणाची तारीख 19 मार्च का?
साहेबराव शेषराव करपे हे यवतमाळ जिल्ह्यातील चील-गव्हाण या गावचे शेतकरी. त्यांचे वडील संगीताचे जाणकार होते. साहेबरावांनीही वडिलांकडून संगीताचे धडे घेतले होते. उदरनिर्वाहाचे साधन शेती. शेती परवडत नाही. दरवर्षी तोटाच होतो. घेतलेली कर्जे फेडता येत नाही, लाईटचे बिल भरता येत नाही, हात उसने घेतलेल्या पैशांची परतफेड करता येत नाही. म्हणून ते अस्वस्थ होते. एके दिवशी पत्नी मालती व चार अपत्यांना घेऊन ते पवनार आश्रमात गेले. तिथे त्यांनी सविस्तर पत्र लिहिले. रात्री जेवणात विषारी औषध कालवून संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली. सकाळी त्या एका खोलीतून सहा शव काढावे लागले. साहेबरावांनी लिहून ठेवलेल्या पत्रात त्यांनी शेतकरी म्हणून जगणे कठीण झाले आहे, असे नमूद केले होते. ते पत्र समस्त शेतकरी समाजाची दु:खद कैफियत मांडणारे होते. साहेबराव यांच्या आत्महत्येने सारा महाराष्ट्र हादरून गेला होता. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी या आत्महत्येची गंभीर दखल घ्या व धोरणे बदला अन्यथा अशा आत्महत्या रोज होतील असा इशारा दिला होता. ही पहिली जाहीर झालेली शेतकर्याची आत्महत्या. ती साहेबराव करपे यांनी 19 मार्च 1986 रोजी केली होती. या 19 मार्चला त्यास 31 वर्षं पूर्ण होत आहेत. म्हणून उपवासासाठी 19 मार्च ही तारीख निवडण्यात आली असल्याची माहिती अमर हबीब यांनी दिली.