एक कसोटी गमावली म्हणजे मालिका गमावणे नव्हे

0

नवी दिल्‍ली : पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून दारूण पराभूत झालेल्या टीम इंडियाला माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने ठाम पाठिंबा दिला आहे. ‘एक कसोटी गमावली याचा अर्थ मालिका गमावली, असा होत नाही. जोरदार कमबॅक करून ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याची क्षमता या संघात आहे,’ असे सचिनने म्हटले आहे. पुण्यातील कसोटीत टीम इंडियाचा 333 धावांनी पराभव झाल्याने विजयाचा अश्‍वमेधही रोखला गेला.

सावरून प्रतिस्पर्ध्यांसमोर आव्हान निर्माण करा
‘ही कसोटी टीम इंडियासाठी आव्हानात्मक होती. हार-जित हा खेळाचा एक भाग आहे; पण या पराभवाने टीम इंडिया खचून जाईल, असे समजू नका. दमदार पुनरागमन करण्याची क्षमता या संघात असल्याने आगामी काळा चित्र नक्‍कीच वेगळे दिसेल,’ असा विश्‍वासही त्याने व्यक्‍त केला आहे. तो म्हणाला, प्रत्येक संघ आणि खेळांडूना त्यांच्या कारकिर्दीत चढउतार पाहायला मिळतात. त्यामुळेच खेळ आणखी रोमांचकारी होतो. प्रत्येक संघाची आणि खेळाडूंची चांगली वेळही येते आणि कठिण वेळ येते. पण त्यातून सावरून प्रतिस्पर्ध्यांसमोर कशा प्रकारे आव्हान निर्माण केला जातो, यावर बरेच काही अवलंबून असते, असेही तो म्हणाला. यावेळी त्याने मॅरेथॉनविषयी मत व्यक्त केले. मॅरेथॉनमुळे अधिकाधिक लोकांना जोडले जात आहे, ही सकारात्मक बाजू आहे. अधिकाधिक लोक या मॅरेथॉनमध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे चांगले आरोग्य लाभत आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या दिल्लीतील लोकांमध्ये चांगलाच उत्साह दिसून येत आहे, असेही तो म्हणाला.