एक गाव एक गणपती संकल्पनेबद्दल पुरस्कार

0

मुंबई | पातोंडा परिसर विकास मंचाच्या वतीने एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यात आली. त्या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील पातोंडा तालुक्यात प्रथम पारितोषिक पातोंडा येथील गणेश मंडळास जाहीर झाले असून शासनाच्या वतीने लवकरच पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांना ते दिले जाईल. या गणेशोत्सवात 10 दिवस विविध सामाजिक व जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित केले गेले. यात विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन तसेच वृक्षारोपण आदी उपक्रम राबविले गेले. व्यसनमुक्ती व अंधश्रद्धा निर्मूलनाबाबतही जनजागृती करण्यात आली.

श्री गणेशाची मिरवणूकही शिस्तबद्ध निघाली होती. या गावचे मूळ ऱहिवासी व माजी प्राचार्य मगन सूर्यवंशी यांनी सुमारे 40 वर्षांपूर्वी म्हणजे 1975 साली 1 गाव 1 गणपती ही संकल्पना सुरू केली होती. त्यांचे मुंबईत स्थलांतर झाल्यानंतर त्यात खंड पडला. 2013 साली सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी वारंवार गावी जावून प्रबोधन केले. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन पातोंडा परिसर विकास मंच व ग्रामस्थांनी त्यानुसार कार्य करण्यास व सहभाग देण्यास प्रारंभ केला. त्यातून ही संकल्पना साकार होत आहे. शासनाच्या वतीने पुरस्कार मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, अशी माहिती नंदकुमार पाठक यांनी दिली.