अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने दरवर्षी अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे आयोजन करण्यात येत असते. गेल्या वर्षापासून अखिल भारतीय मराठी बालनाट्य संमेलनाचे ही आयोजन करायला सुरुवात झाली आहे. या वर्षीचे दुसरे अखिल भारतीय मराठी बालनाट्य संमेलन नांदेड येथे 6 ते 8 जानेवारी 2017ला संपन्न होणार आहे.
विद्यमानात कलाक्षेत्रात विशेषतः सिने-नाट्य माध्यमात बरेच बाल कलाकार वावरताना दिसत आहेत. शालेय जीवनापासूनच लहान मुलांना अभिनयाची ओळख होते, स्नेहसंमेलनात बालनाट्यातून मुलं अभिनय करतात तिथेच त्यांची खर्या अर्थान सुरुवात होते. बरीच बालनाट्य सादर करणार्या नाट्यसंस्था ही यासाठी पुढाकार घेतात. बालमनावर कलासंस्कार आधीच उमटल्यावर पुढे क्षेत्रनिवड जड जात नाही. नाट्यकार्यशाळा, समर व्हेकेशनमध्ये जोमाने भरत असतात. आवडीने तिथे मुले पाठवली जातातही तर काहींना तिथे जबरदस्तीने पाठवले जाते. क्लासेसप्रमाणे येथे भरपूर शुल्क आकारले जाते. इथे आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणार्या पालकांना मुलांमध्ये क्षमता असूनही पाठवता येत नाही. सर्व मुले स्वानंदाने अभिनयात तयार होतात असेही नाही. शेवटी मुलांचे भावविश्व वेगळेच असते. त्यांच्या कले-कलेने जाऊन त्यांना कलासंपन्न बनवता येते. सध्याचे बरेच मोठे नट पूर्वी बालकलाकार म्हणून प्रसिद्ध होते.
बालनाट्यसंमेलन नाट्यपरिषदेचा हेतू चांगला आहे. त्या संदभार्र्त परिषदेने अनेक उपक्रमही घेतले आहेत. मध्यंतरी यशवंत नाट्य मंदिरात बालनाट्य मेळावा घेण्यात आला होतो, बालनाट्य लेखन स्पर्धा ही घेण्यात आली होती. या सार्याबरोबर सर्वव्यापकतेची गरज निर्माण झाली आहे. शहरी भागातील मुलांना वातावरण मिळते हे जितके खरे तितके ग्रामीण भागातील मुलांना वातावरण असतेच असे नाही. जि.प. शाळांच्या विविध स्तरावरील कला-गुण स्पर्धा होत असतात. मात्र, अपवादात्मक एखादे बालक नाट्य-सिनेमांत चमकताना दिसतो.
नाट्यपरिषदेने नाट्यविषयक वाखाणण्याजोगे उपक्रम हाती घेतले आहेत. वेगवेगळ्या गाव-तालुका पातळीवर नाट्यपरिषदेच्या शाखा आहेत. यांना बालनाट्य कलावंत घडवण्याकामी आणखी उपक्रम राबवण्यास हरकत नाही. संमेलने, स्पर्धा होत असतात. शालेय जीवनात बालनाट्य, पथनाट्य ही होतात. मात्र ती स्पर्धा-संमेलनापुरतीच! बालनाट्याचा स्वतंत्र विषय शालेय अभ्यासक्रमात दिला तर कला-शिक्षकांप्रमाणे अनेक नाट्यशिक्षक शाळेतच उपलब्ध झाल्याने स्वतंत्र क्लासेसला पाठवण्याची गरज निर्माण होणार नाही. आधीच निवड पक्की झाल्याने मुलांचे क्षेत्रीय अध्ययन सुलभ होऊन कलाक्षेत्रातील व्यावसायभिमुखतेचे ज्ञान त्यांना उपलब्ध होईल.
नाटकाच्या सर्व अंगाचे बालकडून लहानपणीच मिळाल्याने पुढील पिढी नक्कीच सजग बनेल यात शंका नाही. बालनाट्य-एकांकिका आणि मग नाटक हे टप्पे न राहता थेट नाट्यसंहितेची व्यापकता, प्रगल्भता समजायला सुलभ होईल. फक्त महाविद्यालयीन जीवनात साहित्याचा अभ्यास करताना नाट्यओळख न राहता आधीच परिचय असल्याने साहित्य विषयातील ओढ आधीपासूनच निर्माण होईल. सांस्कृतिक भावविश्वाची जडण-घडण बालपणात पेलता आल्याने उदयाचे भावी कलावंत कला, समीक्षाबाबतीत संकुचित नसतील अशी आशा धरायला हरकत नाही. मागील बालनाट्य संमेलनापासून कांचनताई सोनटक्के या नांदेड येथील दुसर्या अखिल भारतीय मराठी बालनाट्य संमेलनाच्या अध्यक्षा आहेत. त्यांच बालनाट्याचं कार्य मोठ आहे. या वर्षीच्या बालनाट्यसंमेलनात वर्षभरातील उपक्रम व आगामी उपक्रमांबाबत त्या बोलतीलच!
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या या उपक्रमाला सोलापूरप्रमाणे नांदेडला ही प्रतिसाद मिळेल तसे बालकलाकार घडवण्याबाबतची सतर्कता पालकांप्रमाणे प्रत्येक रंगकर्मींनी दाखवली पाहिजे.
– नाट्यपरीक्षण
नाचिस, 9975232775