नाशिक । भाजप सत्तेत आल्यानंतर राज्यात व केंद्र सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची अनेक भ्रष्टाचारांची प्रकरणे बाहेर आली. बेनामी मालमत्तेचा कायदा केल्यानंतर आता काँग्रेस आणि भ्रष्टाचार करणार्यांचे दिवस संपलेत. त्यांना कर्माची फळे भोगावीच लागतील. एक तुरुंगात असून, बाकी वाटेवर आहेत, असे वक्तव्य केंद्रीय मनुष्यबळ विकास व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केल्याने चर्चेला उधाण आले आहे.
भाजपच्या मेळाव्यात बोलताना जावडेकर यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भ्रष्टाचारावर हल्लाबोल करत, काही सूचक वक्तव्येही केली. सिंचन घोटाळ्यात यापूर्वीच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व तत्कालीन जलसंपदामंत्री सुनील तटकरेंवर ठपका ठेवण्यात आला आहे. जावडेकर यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे तूर्तास तुरुंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यानंतर कोणाचा नंबर लागतो, अशी चर्चा उपस्थित भाजप कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती. काँग्रेस सरकारच्या काळात अनेक भ्रष्टाचार व घोटाळे झाले असून, काँग्रेसनेच बेनामी मालमत्ता संदर्भात कायदा केला. मात्र त्याची अंमलबजावणी केली नाही. भाजपने या कायद्याची कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे. टूजी घोटाळ्यासह अनेक घोटाळे झाले. मात्र भाजप सरकारच्या काळात भ्रष्टाचार करणार्यांचे दिवस संपले. प्रामाणिक सरकार व जनतेच्या अपेक्षांचे विश्वासात रूपांतर झालेले सरकार आल्याने चांगले दिवस आले आहेत. भ्रष्टाचारामुळे एक तुरुंगात आहे, बाकी तुरुंगाच्या वाटेवर आहेत. भ्रष्टाचार करणार्या व देशाशी अप्रामाणिक राहणार्यांना भाजप कदापी माफ करणार नाही, असे प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. प्रकाश जावडेकर यांच्या वक्तव्यामुळे आता तुरुंगाच्या वाटेवर नेमके कोण आहेत, याची चर्चा सुरू झाली आहे.