खडकी: काळ्या मातीत पेरणीपासून नांगरणीपर्यंत शेतीची कामे करणार्या शेतकरी राजासोबत एक दिवस घालवीत खडकीतील टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतले शेतीचे धडे गिरवले.
विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत नुकतीच मारुंजी येथील श्री. मुरकुटे यांच्या शेतात भात लावणी करण्यात आली. एनएसएसच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. सुचेता दळवी, प्रा.दत्ताहरी मुपडे व प्रा.विनायक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन केले होते.
मुरकुटे यांच्या एक हेक्टर शेतात एनएसएसच्या 40 विद्यार्थ्यांनी या वेळी भात लावणी करून शेतीचा धडा गिरवला. काळ्या मातीत, चिखलमय शेतात विद्यार्थ्यांनी यावेळी भात लावणी पिकाची पेरणी करीत एक दिवस शेतकर्यांसोबतचा आनंद लुटला. शेतीच्या माध्यमातून पिकपाणी, धान्याची लागवड करणे किती कष्टाचे आणि अवघड काम असते, याचा अनुभव यावेळी या विद्यार्थ्यांनी घेतला. सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून करण्यात आलेल्या या उपक्रमाचे मुरकुटे यांनी भरभरून कौतुक केले. महाविद्यालयाच्या एनएनएस विभागांतर्गत दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबविले जात असल्याची माहिती या वेळी डॉ. दळवी यांनी दिली.