एक-दोन बलात्कार होणारच

0

केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी तोडले आकलेचे तारे

बरेली : उन्नाव आणि कठुआ बलात्कारप्रकरणी बोलताना केंद्रीय मंत्री संतोषकुमार गंगवार यांनी भारतासारख्या मोठ्या देशात बलात्काराच्या एक-दोन घटना होत असतात, ही काही मोठी गोष्ट नाही, असे म्हणत आपल्या आकलेचे तारे तोडले आहेत. त्यांच्या वक्तव्याचा राजकीय क्षेत्रातून विरोध होत आहे. देशात अल्पवयीन मुलींवर होणार्‍या बलात्काराविरोधात मोदी सरकारने कठोर कायदे आणण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे मोदी यांच्या कॅबिनेटमधील केंद्रीय मंत्री संतोषकुमार गंगवार याप्रकरणी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

अशा घटना कधी-कधी रोखता येत नाही
उत्तर प्रदेशमधील बरेली येथे माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, अशा पद्धतीच्या घटना कधी-कधी रोखता येत नाही. तरीही सरकार प्रत्येक ठिकाणी तत्परतेने सक्रिय असून अत्यंत योग्य पद्धतीने ते काम करत आहे. गेल्या काही दिवसांपासून कठुआ आणि उन्नाव बलात्कारविरोधात देशभरात विविध ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे आठ वर्षीय मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर संपूर्ण देश हादरला होता. कठुआमध्ये बकरवाल समाजाला परिसरातून हटवण्यासाठी संशयित आरोपींनी हे कृत्य केल्याचे सांगण्यात येते. मुलीच्या कुटुंबीयांनी या खटल्याची सुनावणी जम्मू ऐवजी चंदीगडमध्ये करण्याची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने यावर जम्मू-काश्मीर सरकारला उत्तर मागितले आहे. उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथेही अशाच पद्धतीने युवतीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. पीडितेने उन्नावचे भाजपा आमदार कुलदीप सेंगर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.