नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांच्या अनोख्या उपक्रमाचे कौतुक
भुसावळ- वारांगणा…. तसे पाहिले तर समाजातील दुर्लक्षित व उपेक्षीतही घटक…. समाजाच्या प्रवाहापासून कोसो दूर असलेल्या या महिलांकडे समाजाचा आजही पाहण्याचा दृष्टीकोण पाहिला तर वाईटच… अशा या वंचित घटकांनाही हक्काचा भाऊ असावा, त्यांच्या अडी-अडचणींमध्ये साथ देण्यासाठी खंबीर पाठीराखा असावा या उदात्तभावनेतून भुसावळातील उपक्रमशील नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते महेंद्रसिंग (पिंटू) ठाकूर यांनी या उपेक्षित महिलांना आपली बहिण मानत मंगळवारी त्यांच्या हस्ते राखी बांधून घेतली. ठाकूर यांच्या या उपक्रमाचे समाजमनातून कौतुक करण्यात आले. बहिण-भावाच्या उत्कट प्रेमाची आठवण करून देणार्या रक्षाबंधनानिमित्त भावाचा उत्कर्ष व्हावा, त्याने आपले रक्षण करावे, अशी भावनाही या निमित्ताने या महिलांनी व्यक्त केली.
उपेक्षीत मात्र त्याही महिलाच -नगरसेवक ठाकूर
नगरसेवक महेंद्रसिंग ठाकुर प्रसंगी म्हणाले की, प्रत्येकाला भावना आहे तशा या महिलांनाही आहेत. समाजापासून दुरावलेल्या काहीशी उपेक्षित असलेल्या या महिलांनादेखील रक्षाबंधन साजरा करण्याचा अधिकार असल्याने आपण त्यांचे पाठीराखे म्हणून पुढे आलो आहोत. यापुढे दरवर्षी या वस्तीत आपण हा सण साजरा करू व प्रभागातील नागरीकांच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी नेहमीच कटीबद्ध राहू, अशी ग्वाही द्यायला ठाकूर विसरले नाहीत त्यामुळे उपेक्षितांच्या वस्तीमध्ये अनेक वर्षांनंतर आनंदाश्रू नकळत तराळले. पाठीराखा भाऊ मिळाल्याने व अनेक वर्षांनंतर का होईना या वस्तीत रक्षाबंधनाचा सण साजरा झाल्याचा आनंद शब्दात सांगता येणार नसल्याची भावना प्रसंगी महिलांनी व्यक्त केली.
नगरसेवक ठाकूर यांचा गौरव
ज्या वस्तीमध्ये आजवर कुठलाही सामाजिक सण साजरा झाला नाही तसेच कुठलेही लोकप्रतिनिधी या भागात कार्यक्रम साजरा करण्यासाठी येत नाही अश्या भागात नगरसेवक महेंद्रसिंग ठाकुर यांनी राबवलेल्या उपक्रमामुळे परीसरातील महिलांनी महेंद्रसिंग ठाकूर यांचे आभार मानले. सूत्रसंचालन संजय ठाकूर तर आभार सीमा सपकाळे यांनी मानले.