पिंपरीतील काँग्रेस कार्यकर्त्यांची आक्रमक भूमिका
पिंपरी ः विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली आहे. मात्र, पिंपरी, चिंचवड आणि भोसरी तिन्ही जागा राष्ट्रवादीकडे आल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच जाहीर केले. त्यात तिन्ही पैकी एक जागा काँग्रेस लढवेल, अशी घोषणा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. त्यामुळे युतीची चर्चा सुरु असताना काँग्रेस-राष्ट्रवादीत देखील बिघाडी होण्याची चिन्हे असून काँग्रेस-राष्ट्रवादीतील जागा वाटपाचा तिढा गुंतागुतीचा होत पिंपरी शहरातील काँग्रेस नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
‘पिंपरी शहरातील तीन पैकी एक मतदारसंघ आम्हाला द्या, अन्यथा राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचारच करणार नाही,’ अशी भूमिका काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतली आहे. त्यामुळे इथं आघाडीत बिघाडी झाल्याचं बोललं जात आहे. आचारसंहिता जाहीर ह्योण्याआधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पिंपरीतील जागांवरून काँग्रेस कार्यकर्त्यांना आश्वासन दिलं होतं. मात्र आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर मेळाव्यात पक्षाचे नेते अजित पवार यांनी शहरातील तीनही मतदार संघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्याचं सांगितलं. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.
सध्या भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्या पिंपरी चिंचवड शहरावर याआधी राष्ट्रवादीचं अधिराज्य होतं. मात्र त्याआधीही हे शहर राज्याच्या राजकारणाचं सत्ताकेंद्र म्हणून ओळखल जायचं ते काँग्रेसचे माजी शिक्षणमंत्री आणि या शहरातील दिवंगत नेते प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांमुळे. त्यामुळे या शहरात काँग्रेसला पुन्हा सुगीचे दिवस परत आणण्यासाठी काँग्रेसकडून एका मतदार संघावर दावा सांगितला जात होता. मात्र तसं झालं नाही आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी शेवटी टोकाची भूमिका घेत राष्ट्रवादीच्या उमेदवारांचं काम न करण्याचा इशारा दिला आहे.