मुठा कालवा दुर्घटना : डॉ. गोर्हे यांची मागणी
पुणे : मुठा कालव्याची भिंत पडून झालेल्या दुर्घटनेची एक महिन्यात चौकशी पूर्ण करून संबंधितांवर कडक कारवाई करावी. तसेच, या घटनेत ज्या नागरिकांची कागदपत्रे पाण्यात वाहून गेली आहेत, त्यांना ती परत मिळण्यासाठी समाधान शिबिराचे आयोजन करावे, अशा मागण्या शिवसेना उपनेत्या, आमदार डॉ. निलम गोर्हे यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे केल्या. दरम्यान, जिल्हाधिकार्यांनीही त्यांच्या मागण्या मान्य करत संबंधित अधिकार्यांना सूचना केल्या.
मुठा कालवा दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर डॉ. नीलम गोर्हे यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, किशोर राजपूत, सूरज लोखंडे, अनंत घरत आणि तानाजी लोकरे उपस्थित होते. जिल्हाधिकार्यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडे वर्ग केलेला 3 कोटींचा निधी नागरिकांच्या विशेष गरजांप्रमाणे वितरण व्हावा. तसेच आणखी काही ठिकाणी कालव्याच्या भिंती खचली असल्याची माहिती घ्यावी, असेही गोर्हे यांनी सांगितले.
काय कार्यवाही केली?
मुठा कालवा फुटू शकतो, असा धोक्याचा इशारा देणारे निवेदन फेब्रुवारी 2018 मध्ये शिवसेना पदाधिकार्यांनी जिल्हाधिकार्यांना दिले होते. त्या निवेदनावर काय कार्यवाही केली, असा प्रश्न गोर्हे यांनी उपस्थित केला.