जळगाव। मंगळवारी 11 रोजी शहरात सर्वत्र हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भाविकांकडून गेल्या काही दिवसांपासून हनुमान जयंतीची तयारी सुरु होती. पहाटे 5.30 वाजेपासून हनुमान जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी हनुमान मंदिरात भक्तीभावात महाभिषेक, महाआरती करण्यात आली. ‘बोल बजरंगी बली की जय’, ‘एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान’, ‘जय श्रीराम जय हनुमान’ अशा घोषणा देत भाविकांनी हनुमान जयंती साजरी केली.
हनुमान जन्मोत्सवानिमित्त शहरातील हनुमान मंदिरात संगीतमय सुंदरकांड पठण, गीतरामायण, भक्तिगीते आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हनुमान जयंतीनिमित्त एक दिवस अगोदरच मंदिरांची सजावट करण्यात आली होती. शहरातील मंदिरामध्ये सकाळपासून विधीवत पूजा केली जात होती. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. हनुमान मंदिरांमध्ये भाविकांसाठी महाप्रसाद आयोजन करण्यात आले. शहरातील गोलाणी मार्केट परिसरातील मंदिर, शाहु नगरमधील हनुमान मंदिरासह इतर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी हनुमान मंदिरात गर्दी केली होती. पहाटेपासूनच हनुमान मंदिरात धार्मिक संगीत वाद्य सुरु होते. शहरातील पुरुष-महिला, तरुण, अबाल वृध्दांपासून सर्वांनीच जयंती साजरी केली. दरम्यान दिवसभर उन्हाच्या तिव्र झळा जाणवत होत्या मात्र हनुमान उन्हाची पर्वा न करता भक्तांनी मोठ्या उत्साहात हनुमान जन्मोत्सव साजरा केला.
या ठिकाणी जयंती साजरी
जिल्हा परिषदेजवळील पत्र्या हनुमान मंदिर, गोलाणी मार्केट परिसरातील हनुमान मंदिर, चिमुकले राम मंदिरातील हनुमान मंदिर, भूषण कॉलनीतील श्रीमंत हनुमान मंदिर, स्टेशन रोडवरील पोलिस चौकीतील हनुमान मंदिर, पंचमुखी हनुमान मंदिर, शिवाजीनगरमधील दक्षिणमुखी हनुमान मंदिर, शाहूनगरमधील तपस्वी हनुमान मंदिर, मायादेवी परिसरातील हनुमान मंदिर, स्वातंत्र्य चौकातील माजी खासदार वाय.जी.महाजन जिम्नॅशियम हॉल, पिंप्राळा येथील शंकर अप्पा नगरातील कष्टभंजन वीर हनुमान मंदिर आदी ठिकाणी हनुमान जयंती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सुंदरकांड भक्तीगीते
शाहुनगरातील सालासर भक्त मंडळाच्या वतीने मंगळवारी सायंकाळी 6 वाजता शहरातील बालगंधर्व खुले नाट्यगृहात सामूहिक संगीतमय सुंदरकांड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंचमुखी हनुमान मंदिर, गोलाणी मार्केट जवळीच दक्षीण मुखी हनुमान मंदिराच्या वतीने देखील सुंदरमय संगीत सुंदरकांड पठण आयोजन करण्यात आले होते. माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने बालाजीपेठेतील बालविहार येथे दुपारी 4 वाजता सुंदरकांड व हनुमान चालीसा पठण कार्यक्रम घेण्यात आले.
महाप्रसादाचे आयोजन
विविध मंडळे, संस्थेच्या वतीने जळगावातील हनुमान मंदिरांमध्ये भाविकांसाठी महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते. सकाळी 11 वाजेपासून महाप्रसादासह भोजन सुरु होते. दुपारी 4 वाजेपर्यत भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. पंचमुखी हनुमान मंदिर, शाहु महाराज तपस्वी हनुमान मंदिर, शिवाजीनगरमधील दक्षिणमुखी हनुमान मंदिर, मायादेवी परिसरातील हनुमान मंदिर आदी ठिकाणी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
हनुमान जयंतीला शिरसोलीत वानराचा मृत्यू
जळगाव। सर्वत्र हनुमान जयंती उत्साहात मनविली जात असतांना शिरसोली परीसरात मात्र वानराचा शॉर्ट सर्क्रीट मळे धक्का बसुन मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास धडली. या घटनेमुळे परीसरातून हळहळ व्यक्त केली जात होती. येथील ग्रामस्थांनी माकडाचा विधीवत अंत्यसंस्कार करून सामाजीक भावना जोपासली. शिरसोली परीसरातील बसस्थानका परीसरात सकाळच्या सुमारास असलेल्या रोहित्राला माकडाचा स्पर्श झाल्याने ते जागीच गतप्राण झाले. या घटनेत रोहीत्राला देखिल आग लागली होती. या घटनेसंदर्भात गावातील नागरीकांनी कनिष्ठ अभियंता ठाकरे यांनी माहिती कळविली. गावातीचल वायरमन बारी यांनी रोहीत्रावरील आग विझवीली. यामुळे पुढील हानी टळली. हनुमान जयंतीच्याच दिवशी ही घटना घडल्याने हनुमान मंदीर परीसरातील रहिवासी नागरीकांनी मृत झालेल्या माकडावर विधीवत पूजा करून गावातून अंत्ययात्रा काढली. तसेच त्याचा दफनविधी देखिल केला. यावेळी गावातील नागरीकांची मोठ्या संखेने उपस्थिती असल्याचे सांगण्यात आले.
संदेश, शुभेच्छांचा वर्षाव
प्रत्येक सण उत्सवाला एकमेकांना शुभेच्छा संदेश पाठविले जातात. शुभेच्छांचा देवाण घेवातीतुन सण उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. हनुमान जयंतीनिमित्त देखील सोशल मिडीयात दिवसभर हनुमान जयंतीनिमित्त शुभेच्छांचा वर्षाव सुरु होता. शुभेच्छा दर्शक चित्रे तसेच लिखीत संदेशाद्वारे शुभेच्छा देण्यात येत होते. शहरात ठिकठिकाणी शुभेच्छा दर्शक फलक लावण्यात आलेले होते. विविध सामाजिक संस्था, संघटना तसेच राजकीय पक्षांचे फलक लावण्यात आलेले होते.