अकोला येथे कामर्स कॉलेजला असतांना नेतृत्वाची संधी चालून आली दोन हजार विद्यार्थी संख्येमधून बहुमतांनी विजय होत प्रथम ‘जीएस’ होण्याची संधी मिळाली. त्यानंतर नागपूर विद्यापीठातील ‘युआर’ होण्याचा मान मिळाला. शिक्षण पूर्ण झाल्यावर गावाकडची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे साहजिकच कोथळी गावच्या दिशेने पाऊले वळली आणि सुरुवात झाली एका संघर्षाची. सुरुवातीच्या काळात नाथाभाऊंनी आपल्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. सर्वप्रथम 1978 जयकिसान पीक सरंक्षण संस्था अध्यक्ष म्हणून भाऊंची निवड झाली यानंतर नाथाभाऊंच्या खर्या राजकीय जीवनास येथूनच सुरुवात झाली. गावात परतल्यानंतर भाऊंनी गावातील तरुणांना सोबत घेवून कोथळी ग्रामपंचायतमध्ये स्वतःचे पॅनल उभे केले. पहिल्याच प्रयत्नात अपयश आल्यानंतर नाउमेद न होता त्यांनी शेतकरी संघाची निवडणूक लढवली. यात दणदणीत यश मिळवल्यानंतर चेअरमनपदाची संधी मिळाली. चेअरमन हे पंचायत समितीचे पदसिध्द सदस्य असल्याने नाथाभाऊंची 1984 साली पंचायत समितीचे एंट्री झाली. यानंतर पुन्हा एकदा ग्रामपंचायत निवडणूक लढवली यात यश मिळवून ते कोथळीचे सरपंच झाले आणि जिल्ह्यात भाजपाच्या ताब्यात असलेली एकमेव ग्रामपंचायत अशी कोथळी गावची ओळख निर्माण झाली.
या काळात जळगाव जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. या काळातील पक्षाचे नेते अशोक फडके यांच्या दुर्देवी निधनामुळे नाथाभाऊंना 1990 साली विधानसभा निवडणूक लढविण्याची संधी मिळाली. आणि पहिल्याच प्रयत्नात भाऊ विधानसभेत पोहचले आणि सुरुवात झाली. काँग्रेसच्या पतनाची जळगाव जिल्हा म्हणजेच काँग्रेसचा बालेकिल्ला हे अलिखीत समीकरण होते. पायाला भिंगरी लावून भाऊंनी अख्खा खान्देश पिंजून काढला. गावागावात भेटी दिल्या पक्षासाठी गावसभा घेतल्या तरुणांमध्ये पक्षाविषयी विश्वास निर्माण करुन दिला. काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांशी एकटे नाथाभाऊ भिडले. पक्षामध्ये येणार्यांची संख्या हळूहळू वाढत गेली. गावागावात शाखा स्थापन होऊ लागल्या या सर्व यशाचे श्रेय फक्त नाथाभाऊंनाच जाते. 1995 साली महाराष्ट्रात युतीचे शासन आले. जिल्ह्यात भाजपाचे 5 आमदार निवडून आले या यशाचे मानकरी म्हणून भाऊंना अर्थमंत्री पद मिळाले नंतर उच्चशिक्षण खाते आणि 1997 साली भाऊंना त्यांच्या जिव्हाळ्याचे पाटबंधारे खाते मिळाले. येथूनच सुरु झाली हरीतक्रांती. खान्देशातील जास्तीत जास्त जमिन सिंचनाखाली यावी म्हणून दूरदृष्टी असलेल्या नाथाभाऊंनी तापी विकास महामंडळाची स्थापना केली. अमळनेर तालुक्यातील संजीवनी ठरणार्या पाडळसरे धरणाची मुहुर्तमेढ नाथाभाऊंनीच रोवली. बोदवड उपसा सिंचन प्रकल्पाकरीता यशस्वी पाठपुरावा केला. तापी नदीवर अशक्य वाटणार्या पुलांची निर्मिती करुन रावेर-मुक्ताईनगर तालुके एकमेकांना जोडले. हे तर भाऊंचे विरोधकही दिलदारपणे मान्य करतात. हे सर्व करत असतांना भाजपा घराघरात पोहचावा म्हणून नाथाभाऊंचे अथक प्रयत्न सुरुच होते. भाऊंनी घेतलेल्या मेहनतीमुळेच अनेकांचा राजकीय उदय झाला. काँग्रेसची वतनदारी असलेली जिल्हा परिषद नावाची संस्था खालसा करुन त्यावर भाजपचा झेंडा फडकविला तो आजपर्यंत कायम आहे.
1999 साली युतीची सत्ता गेली. नाथाभाऊ विरोधी बाकावर आले. आणि त्यांनी सत्ताधार्यांना विधानसभेत सळो की पळो करुन सोडले. रस्त्यावर उतरुन संघर्ष केला. शेतकर्यांसाठी जनतेच्या न्यायहक्कासाठी सत्ताधार्यांशी भांडून लढा उभा केला. 2009 साली नाथाभाऊंना विरोधी पक्षनेते पदाची संधी मिळाली प्रत्येक वेळी विधानसभेत भाऊंनी अभ्यासपूर्ण प्रसंगी आक्रमक भाषण केली. विकासात्मक मुद्दे मांडले. लोकहितासाठी निर्णय घेण्यासाठी सरकारला भाग पाडले. सरकार विरुध्द लोकांमध्ये अविश्वास निर्माण झाला. यामुळे 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात भाजपाचे सरकार स्थापन झाले. भाऊंचा मंत्रीमंडळात समावेश होऊन तब्बल 12 महत्वाच्या खात्यांची जबाबदारी भाऊंना दिली. प्रत्येक खात्याला न्याय देत भाऊंनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेऊन त्यांची यशस्वी अंमलबजावणी केली. प्रथमच सहकार क्षेत्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व मोडून जिल्हा बँक, दूध फेडरेशन भाजपाच्या ताब्यात घेतले. सर्वकाही सुरळीत होते.पण नाथाभाऊंचे वाढते राजकीय वचर्स्स्व काहींना सहन झाले नाही.
नाथाभाऊंचे खच्चीकरण व्हावे म्हणून खान्देशातील प्रकल्प स्थलांतरीत किंवा बंद होत असतांना कुणीही आवाज उठविला नाही. पण खान्देशवर होत असलेला अन्याय पाहून त्यांनी विधानसभेत घरकाळी फोडली. खान्देशात मंजूर केलेले कृषी अवजार संशोधन केंद्र, तूर संशोधन केंद्र, केळी संशोधन केंद्र, कृषि विद्यापीठ, पशुवैद्यकीय महाविद्यालय, लिंबूवर्गीय संशोधन केंद्र, पोलीस प्रशिक्षण केंद्र हे खान्देशातच राहतील असे ठोस आश्वासन सरकारला द्यावे लागले. खान्देशच्या विकासाची एवढी तळमळ फक्त नाथाभाऊंनाच आहे. आजही नाथाभाऊंचे गारुड कायम आहे, हे बोरविली येथील प्रदेश कार्यकारीणी बैठकिनंतर पडलेल्या तरुणांच्या गराड्यावरुन सिध्द झाले. पक्षवाढीसाठी कार्य सुरुच ठेवा हे तर भाऊंच ठरलेलं वाक्यच आहे. पक्षावर एवढ्या प्रचंड निष्ठेच दुसरे उदाहारण महाराष्ट्रात नसेल. सध्या आ. एकनाथराव खडसे हे संघर्षरत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. अर्थात त्यांनी आपल्या आयुष्यात अशी अनेक आव्हाने पचवली आहेत….त्यावर मात केली आहे. यामुळे सध्या सुरू असणार्या परीक्षेतून ते पुन्हा तावून-सुलाखून निघत खान्देशच्या हितासाठी याच तडफेन कार्य करतील हा विश्वास जनतेला आहे.
सर्वसामान्य जनतेसाठी कामाची अढळ निष्ठा ठेवून अविरतपणे पक्षभेद न बघता असेल त्या ताकदीनिशी धावून जाणारा आणि रंजल्या गांजल्यांच्या पाठीशी ताकद उभी करणारा जनतेचा खराखुरा लढवैया नेता असणार्या जिल्ह्याचे एकहाती नेतृत्व करणार्या आदरणीय एकनाथराव खडसे उर्फ नाथाभाऊ यांना वाढदिवसानिमित्त लक्ष-लक्ष शुभेच्छा…!