नवी दिल्ली । भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारत आणि पाकिस्तानने आपापली बाजू मांडली. देशातील सर्वात महागडे वकील हरिश साळवे यांनी न्यायालयात भारताचे प्रतिनिधीत्व केले. सर्वाच महागडे वकिलांच्या यादीत हरिश साळवे यांचे नाव आहे. एका दिवसाच्या सुनावणीसाठी ते तब्बल 30 लाख रुपये फी घेतात. मात्र, कुलभूषण जाधव यांच्या सुनावणीसाठी त्यांनी केवळ एक रुपया फी घेतली आहे. खुद्द परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ही माहिती दिली.
एक ट्विटर युझरने जाधव यांच्या खटल्यासंबंधी सुषमा स्वराज यांना प्रश्न विचारल्यानंतर साळवे यांनी 1 रूपया शुल्क घेतल्याचे समोर आले. हरीश साळवे यांच्याऐवजी एखादा दुसरा वकीलही जाधव यांची बाजू मांडू शकला असता. तोही साळवेंपेक्षा कमी शुल्क घेऊन, असे त्याने ट्विट केले होते. त्यावर उत्तर देताना स्वराज यांनी, हे योग्य नाही. साळवे यांनी या खटल्यासाठी अवघे 1 रूपये शूल्क घेतले आहे, असा खुलासा केला आणि त्यानंतर सार्यांनीच तोंडात बोट घातले.
दरम्यान, हेग स्थित आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताच्या वतीने हरीश साळवे यांनी जाधव यांची बाजू मांडली. त्यांनी अनेक उदाहरणे देत पाकिस्तानचा खोटेपणा न्यायालयासमोर उघड केला. साळवे हे सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील आहेत. तर हरीश साळवे यांनी देशाचे सॉलिसिटर जनरल म्हणूनही यापूर्वी काम पाहिले आहे.