नुकतीच वर्तमानपत्रांमधून एक बातमी झळकली. ज्येष्ठ पत्रकार मुझफ्फर हुसेन यांचे दुःखद निधन. तसे म्हटले तर पत्रकारांच्या निधनानंतर एक कॉलम बातमी छापून येणे इतकंच काय ते दखल घेण्यासारखं, अशी प्रथा पडली आहे. परंतु, काही नावे अशी असतात की त्यांची दखल त्यांच्या योग्यतेने घ्यायलाच हवी. त्यातीलच एक नाव म्हणजे मुझफ्फर हुसेन. ते कट्टर राष्ट्रभक्त मुस्लीम, समरसतावादी, सावरकरवादी आणि लढवय्ये पत्रकार होते. सामाजिक चळवळींशीही त्यांचा जवळचा संबंध होता. हुसेन यांचे अनेक भाषांवर प्रभुत्व होते. दहशतवाद, मुस्लीम राष्ट्रांमधील घडामोडी यावर त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यांची विविध विषयांवरील अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली. ‘इस्लाम व शाकाहार’, ‘मुस्लीम मानसशास्त्र’, ‘दंगों में झुलसी मुंबई’, ‘अल्पसंख्याक वाद- एक धोका’, ‘इस्लाम धर्मातील कुटुंबनियोजन’, ‘लादेन, दहशतवाद आणि अफगाणिस्तान’, ‘समान नागरी कायदा’ ही त्यांची पुस्तके वाचकप्रिय ठरली.
मुंबईतील विश्व संवाद केंद्राच्या स्थापनेपासून ते उपाध्यक्ष होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा जवळचा संबंध होता. मुस्लिमांनी हिंदूंशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवणे गरजेचे आहे हे नेहमीच ते निक्षून सांगत. गेल्या अनेक वर्षांपासून ते शाकाहारी बनले होतेच, पण ‘इस्लाम व शाकाहार’ या बहुचर्चित पुस्तकात त्यांनी याविषयी सविस्तर भाष्यही केले आहे. ते जितके सच्चे मुसलमान होते तितकेच सच्चे सावरकरभक्तही होते. सावरकरांचा हिंदुत्ववाद भारताच्या राष्ट्रीयत्वाशी जोडला गेलेला आहे, हे त्यांनी मान्य केले होते. प्रस्थापित मुख्य प्रवाहातील दैनिकांमध्ये त्यांच्या लिखाणासाठी आग्रह असायचा. ते जितक्या अभिमानाने कुराण पठण करत तितक्याच अभिमानाने वंदे मातरम्ही म्हणत. ‘पद्मश्री’ किताबासह अनेक मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले होते. परभणी येथे झालेल्या समरसता साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मुजफ्फर हुसेन यांचा जन्म 20 मार्च 1940 चा. भोपाळ ही त्यांची जन्मभूमी. विक्रमविश्वविद्यालयातून ते पदवीधर झाल्यानंतर नोकरीसाठी मुंबईत आले आणि मुंबईकर झाले. वकील होण्याची इच्छा असल्याने त्यांनी विधी शाखेची पदवी घेतली. त्यांनी कधी वकिली केली नाही, पण इस्लाममधील तलाकसारख्या जाचक प्रथा-परंपरांवर तसेच दहशतवादावर त्यांनी आपल्या प्रभावी भाषणांतून वेळोवेळी टीका केली. लेखनातून त्यावर निर्भीडपणे आसूड ओढले.
पत्रकाराचे काम हे समाजाचा आरसा होण्याचे आणि समाजमनाला योग्य दिशा दाखवण्याचे आहे. त्यांना सामाजिक संरक्षण मिळाले पाहिजे. सध्या महाराष्ट्र सरकार पत्रकारांच्या संरक्षणाचा कायदा आणत आहे. देशातले महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे जे पत्रकारांच्या संरक्षणासाठी पाऊल उचलत आहे. पत्रकारांच्या पेन्शन आणि आरोग्य सुविधांबाबतही महाराष्ट्र सरकारची पावले पडू लागली ही एक समाधानाची बाब. पत्रकारांच्या हल्ल्याच्या आणि हत्यांच्या बातम्या वाचायला मिळतात. नागपुरातही पत्रकाराच्या आई आणि मुलीची हत्या झाल्याचे प्रकरण नुकतेच प्रकाशात आले. अशा घटना संतापजनक आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याच जिल्ह्यातील हे प्रकरण आहे. पत्रकारांवरील हल्ल्याबाबत नुसती कायद्याची वरवरची मलमपट्टी न करता कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, तरच त्यांचे आत्मबल आबाधित राहील.
– राजा आदाटे
वृत्तसंपादक जनशक्ति, मुंबई
8767501111